ठाण्यातील हिरानंदानी मेडोज समोरील उद्यानाला वीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी वीर सावरकरप्रेमींकडून होत होती. त्यासाठी बराच पाठपुरावा करण्यात आला. अखेर या उद्यानाच्या नामकरणाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यावेळी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८व्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी हा प्रस्ताव मंजूर झाल्याने हा दुग्ध शर्करा योग आहे, अशा शब्दांत वीर सावरकरप्रेमींनी आनंद व्यक्त केला. यापुढे आता हे उद्यान ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ या नावाने ओळखले जाणार आहे.
नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी मांडला नामकरणाचा प्रस्ताव!
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्र. ४ ब च्या नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांनी १६ डिसेंबर २०२० रोजी ठाणे महापालिका आयुक्तांकडे हा नामकरणाचा प्रस्ताव मांडला होता. हिरानंदानी मेडोज समोरील उद्यानास ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ असे नाव देण्यात यावे, अशी प्रभागातील नागरिकांची मागणी आहे. लवकरात लवकर हे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्याप्रमाणे या संबंधीचा प्रस्ताव अखेर वर्तकनगर प्रभाग समितीच्या बैठकीच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला. ही बैठक २७ मे रोजी ऑनलाईन झाली. त्यामध्ये हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. त्याला अन्य पक्षांतील नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्याने हा महत्वाचा प्रस्ताव संमत झाला. सहा महिन्यांपूर्वी या उद्यानाला वीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी या उद्यानाकडे स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते.
(हेही वाचा : वीर सावरकरांच्या जयंतीदिनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य आणि समाजसेवा पुरस्कारांचे आयोजन)
या उद्यानाला वीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी आपण वर्षभर पाठपुरावा केला, त्याच फलित म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८व्या जयंती दिनाच्या आदल्यादिवशी नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला, याबाबत समाधान वाटते, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, विश्वस्त व हॅप्पी व्हॅली फेज १ कॉ.हो.सो.अध्यक्ष शैलेंद्र चिखलकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community