पंजाब मेल आणि डेक्कन क्वीन या दोन लेजेंडरी एक्स्प्रेसचा आज वाढदिवस असून पंजाब मेलला 110 वर्षे तर डेक्कन क्वीनला 92 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. 1 जून 1912 ला पंजाब मेल तेव्हाच्या बॅलार्ड पियर स्टेशनवरुन सुटली तर 1 जून 1930 ला डेक्कन क्वीनने आपला पहिला प्रवास सुरु केला. मध्य रेल्वेच्या या दोन ऐतिहासिक गाड्या 1 जून रोजी त्यांचा वर्धापन दिन साजरा करत आहेत. भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या एक्स्प्रेस ट्रेन्सपैकी एक पंजाब मेल 110 वर्षे पूर्ण करत असून 1 जून रोजी 111 व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरे, मुंबई-पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन ही प्रीमियम ट्रेन देखील आज 92 वर्षांची होणार आहे.
1930 रोजी ‘डेक्कन क्वीन’ ग्रेट इंडियन पेनिन्सुला द्वारे लॉन्च
‘डेक्कन क्वीन’ 1 जून 1930 रोजी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेद्वारे लॉन्च करण्यात आली. आता आपण जिला मध्य रेल्वे म्हणून ओळखतो. इलेक्ट्रिक लोको असलेली पहिली डिलक्स ट्रेन मध्य रेल्वेवर सुरू करण्यात आली, तिला ‘क्वीन ऑफ डेक्कन’ (दख्खनची राणी) म्हणूनही ओळखले जाते. या ट्रेनला 7 डब्ब्यांच्या दोन रेकने चालवली गेली होती, त्यापैकी एक रेक स्कार्लेट मोल्डिंगसह चांदीच्या रंगात रंगविला गेला होता आणि दुसरा रेक रॉयल निळ्या रंगात सोनेरी रेषांनी रंगला होता. मूळ रेकच्या डब्यांच्या आतील फ्रेम्स इंग्लंडमध्ये तयार केल्या गेल्या होत्या, तर डबे जीआयपी रेल्वेच्या मांटुगा कारखान्यात तयार केले गेले होते. सध्या ही ट्रेन 17 डब्यांसह धावते. 91 वर्षांनंतरही ही ट्रेन प्रवाशांची पहिली पसंती कायम आहे. डेक्कन क्वीन पुश-पुल इंजिन लावण्यात आले आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 22 जूनपासून डेक्कन क्वीन एलएचबी रेकने धावेल म्हणजे या ट्रेनचे जुने डबे बाजूला करुन नवीन रंगसंगती आणि सोयी सुविधा असलेले एल एच बी प्रकारातील डबे जोडण्यात येणार आहे. 4 एसी चेअर कार, 1 विस्टाडोम कोच, 8 सेकंड क्लास चेअर कार, 1 जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार असणार आहे.
1911 मध्ये धावली पंजाब मेल
मुंबई ते पेशावर ही पंजाब मेल 1911 मध्ये सुरू झाली. पंजाब मेल तेव्हाच्या बॅलार्ड पियर स्टेशनवरुन सुटली. पंजाब मेल फ्रंटियर मेलपेक्षा 16 वर्षांनी जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते थेट आताच्या पकिस्तानातील पेशावर या शहरापर्यंत पंजाब मेल धावायची. एकूण 2496 किमीचे अंतर ती 47 तासात पूर्ण करायची. त्यावेळी या गाडीला केवळ 6 डबे होते, त्यातील 3 डबे हे प्रवाशांसाठी असूव त्यात केवळ 96 प्रवासी असायचे. उर्वरित डबे टपाल आणि माल वाहतूक करायचे. आता हिच गाडी 1930 किमीचा प्रवास 34 तासात करते आणि मुंबई ते फिरोजपुर अशी धावते.
Join Our WhatsApp Community