समर्थ रामदासांच्या जन्मगावी जांब समर्थ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. माहितीनुसार, मंदिरातून 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील ऐतिहासिक दुर्मिळ पंचधातूंच्या मुर्त्या चोरी करण्यात आल्या आहेत. समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम लक्ष्मण सीतेची मूर्तीदेखील चोरली गेली आहे. तसेच, ऐतिहासिक पंचायतनदेखील चोरीला गेले आहे.
रामदास स्वामी झोळीत ठेवत असलेली तसेच दंडात बांधत असलेल्या मारोतीच्या मुर्त्यादेखील चोरीला गेल्या आहेत. घटनेची माहिती कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रात्री 3 च्या सुमारास चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पाळत ठेऊन मंदिरातील चावी घेऊन चोरी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
( हेही वाचा: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड )
विधासभेत पडसाद, राजेश टोपेंनी उपस्थित केला मुद्दा
विधानसभेत आमदार राजेश टोपे यांनी या चोरीचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, पहाटे तीन वाजता चोरट्यांनी जांब समर्थ येथील मंदिरातील मुर्त्या चोरल्या आहेत. या घटनेमुळे जनमाणसात रोष आहे. समर्थ रामदासांच्या जन्मागावी जांब समर्थ येथील राम मंदिरात महाराष्ट्रभरातून भाविक येत असतात. राज्य सरकारने या स्थळाला ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभिर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी विधानसभेत केली.
Join Our WhatsApp Community