1971 ला अस्तित्वात आलेला बांगलादेश हळूहळू प्रगती करत होता. या देशाला आता विकासाच्या वाटेवर चालायचे होते. हे वर्ष होते 1985. या देशाच्या राजकीय-सामाजिक पैलूत अनेक गोष्टी सुरळीत नसल्या, तरी सर्व काही ठीक होते.
मे 1985 ची ती काळरात्र
वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या 25 तारखेला जे घडले, त्याने बांगलादेशातील तीन मोठी शहरे आणि वसाहती नष्ट केल्या आणि सोबतच बांगलादेशची ताकदही. त्या रात्री जे घडले ते दोन दिवस चालले आणि चितगाव, कॉक्स बाजार आणि नोआखली ही शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. जीवनात नुसते वादळ येते, असे नाही तर विनाश होतो असे म्हणतात, ते अक्षरशः खरे ठरले. कारण, 1985 मध्ये 25-26 मे रोजी आलेल्या वादळाने मोठा विध्वंस केला होता.
23 मे पासून हवामान बदलण्यास सुरुवात
त्या काळातील एका जुन्या रेडिओ स्टेशनवर तीन-चार दिवसांपूर्वी येणाऱ्या वादळी संकटाची माहिती देण्यात आली होती. सरकार बचाव, मदत आणि जीवन वाचवण्याच्या मोहिमेत गुंतले होते. 23 मे पासून, हवामानाची दिशा बदलू लागली आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीच्या लोकांना जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागला.
24-25 मे रोजी जोरदार वाऱ्यांचे चक्रीवादळात रुपांतर झाले
24-25 मे रोजी या वाऱ्यांचे चक्रीवादळात रूपांतर झाले. वाऱ्याचा कमाल वेग चितगावमध्ये 154 किमी/तास, कॉक्स बाजारमध्ये 100 किमी/तास होता. या जोरदार वाऱ्याने विध्वंसाचे पहिले दृश्य दाखवले आणि किनारी भागात जे काही दिसत होते ते सगळे जमिनीत गाडले गेले. त्या चक्रीवादळात गरिबांच्या वस्त्यांच्या खुणाही पुसल्या गेल्या आणि चक्रीवादळामुळे उन्मळून पडलेल्या झाडांनी लोकांचा जीव घेतला.
हजारो लोकांचा गेला जीव
25 मे रोजी वादळाने 3.0 ते 4.6 मीटर उंची गाठली. या भीषण चक्रीवादळात 11 हजार 69 लोकांचा मृत्यू झाला, 1 लाख 35 हजार 33 गुरेढोरेही मरण पावली आणि 94 हजार 379 घरे आणि 74 किमीचे रस्ते, बंधारे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तेव्हा वादळांना नाव देण्याची परंपरा विकसित पद्धतीने रुजू झाली नव्हती.
( हेही वाचा: LPG सिलिंडरचे दर महागले; गॅसची बचत करण्यासाठी या आहेत सोप्या टिप्स )
वादळ (1B) चा कहर
या विनाशी चक्रीवादळाला ट्रॉपिकल स्टॉर्म वन (1बी) असे नाव देण्यात आले. 22 मे 1985 रोजी मध्य बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ निर्माण झाले. 25 तारखेला बांगलादेशला धडकण्यापूर्वी 70 मैल प्रतितास वेग या वादळाने धारण केला. वादळामुळे मुसळधार पाऊस आणि पूर आला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला. या वादळानंतर लगेचच बांगलादेशला आणखी एका दुर्घटनेला सामोरे जावे लागले. वादळाचा जोर कमी झाल्यानंतर, बेघर आणि उद्ध्वस्त झालेल्या लोकांमध्ये कॉलरा पसरला आणि महामारीसारखी स्थिती निर्माण झाली.