तानाजी मालुसरे यांनी लढवलेल्या कोंढाणा किल्ल्याची पराक्रम कथा वाचली वा ऐकली नाही, असा व्यक्ती मिळणे अशक्य. कोंढाणा किल्ल्याच्या लढाईसाठी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपला मुलगा रायबा याचे लग्नही पुढे ढकलले. ‘लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’ या एकाच ध्येय्याने उदयभानशी दोन हात करणा-या तानाजींच्या शौर्याच्या कथा आजही सांगितल्या जातात.
कोंढाणा किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी आपला मुलगा रायबा याचे लग्न नंतरही होई शकते असे म्हणत, ‘आधी लगीन कोंढाण्याचे, नंतर रायबाचे’ अशी प्रतिज्ञा केली. कोंढाणा लढवताना, वीर मरण आलेल्या या योद्ध्याचा सुपुत्र रायबा याचे पुढे काय झाले ते पाहुया.
असे घडले रायबा
तानाजी मालुसरे यांना वीरमरण आल्यानंतर, स्वत: शिवरायांनी नऊ वर्षांच्या रायबाचे लग्न लावले. लग्नानंतरही रायबांवर महाराजांचे लक्ष होते. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे रायबाची आई लक्ष्मी हिने आपल्या मुलाला शस्त्रविद्येचे शिक्षण दिले. रायबा मोठे होत होते आणि वडिलांप्रमाणेच शस्त्रविद्येत आपलं कौशल्य सिद्ध करत होते. महाराजांच्या विश्वासातील मातब्बर मावळ्यांनी रायबांना अधिक उत्तम प्रशिक्षण दिले. धाडसी स्वभावाच्या आणि शूर असलेल्या रायबांचे कौशल्य पाहून महाराजांनी रायबांना पायदळाच्या तुकडीचे सरनौबतपद सोपवले. त्याकाळी एवढी मोठी जबाबदारी पेलणारे ते सर्वात लहान सेनापती होते.
स्वराज्याच्या रक्षणार्थ महाराजांनी केली किल्ल्याची निवड
रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर, स्वराज्याची दक्षिण बाजू बळकट करण्यासाठी, महाराजांनी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले. दक्षिणेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा पाहिल्यानंतर, येथे एक तरी गड असावा, असे महाराजांना वाटले. एखादा गड आपल्या ताब्यात आला, तर स्वराज्याच्या आतीलच नव्हे, तर सीमेबाहेरील शत्रुनांही रोखण्यात यश मिळेल या दूरदृष्टीने महाराजांनी एका गडाची निवड केली.
पारगडावर रायबांचे नाव कोरले गेले
कोल्हापूर जिल्ह्यातील समृद्ध तालुका अशी ओळख असलेल्या चंदगडमध्ये दिमाखाने उभा राहिलेला एक किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला. सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम असलेला हा किल्ला स्वराज्यातील इतर किल्ल्यांपासून दूर होता. 1674 साली किल्ल्याची डागडूजी पूर्ण झाल्यावर या गडाचे पारगड असे नामकरण करण्यात आले. मात्र स्वराज्याच्या रक्षणासाठी निवडलेल्या या किल्ल्याचे नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न उभा राहताच, महाराजांनी रायबा मालुसरेंची निवड केली आणि कमी वयात आणखी एक मोठी जबाबदारी रायबांवर आली. या गडाचे नेतृत्व देताना महाराजांनी रायबाला सांगितले की, सूर्य- चंद्र असेपर्यंत हा किल्ला अभेद्य ठेवा, पारगडाचे रक्षण करा, त्याची काळजी घ्या, त्या क्षणानंतर, पारगडावर रायबांचे नाव कोरले गेले.
स्वराज्य सुरक्षित राहावे यासाठी रायबांनी आखलेल्या रणनितीचे विशेष कौतुक केले जाते. रायबांच्या प्रयत्नामुळे केवळ परागडच नव्हे, तर स्वराज्य आणि त्याच्या सीमाही सुरक्षित राहिल्या. महाराजही त्या रस्त्यावरुन जात असताना, पारगडावर आवर्जून येत आणि रायबांच्या पारगड अभेद्य ठेवण्याच्या रणनितीचे तोंड भरुन कौतुक करीत.
( हेही वाचा: ATMच्या शोधाची भन्नाट कहाणी )
( हेही वाचा औरंग्याच्या थडग्याचा उद्धार, पण महाराणी ताराबाईंच्या समाधीची उपेक्षा! छत्रपतींच्या महाराष्ट्रात चाललंय काय? )
आजही मालुसरेंची पिढी पारगडावर मुक्कामी
महाराजांच्या मृत्यूनंतरही रायबांनी पारगड राखला. एक, दोन नव्हे तर तब्बल साठ वर्षे रायबा पारगडावर राहून स्वराज्याच्या सीमांवर दक्ष होते. आपल्या या कर्मभुमीतच रायबांनी शेवटचा श्वास घेतला. पण त्याआधी त्यांनी आपल्या मुलांच्या हाती पारगडाचे नेतृत्त्व सोपवले. रायबांनंतर मुंबाजी, येसाजी, अप्पाजी अशी मालुसरेंच्या अनेक वंशजांनी पारगड्याचे अधिपत्य राखले.
आजही मालुसरेंची एक पिढी पारगडावर मुक्कामी आहे. अनेक परकीय आक्रमणे, अनेक शत्रुंनी केलेल्या चढाया यानंतरही पारगड अभेद्य ठेवण्यात रायबा यशस्वी झाले, परिणामी स्वराज्याचा अभेद्य किल्ला अशी पारगडाची ओळख निर्माण झाली.