डॅडींच्या दगडी चाळीचा ‘इतिहास’! (भाग-1)

येत्या काही वर्षांत उरल्या सुरल्या या चाळी देखील मुंबईतून नाहीशा होतील. त्यापैकीच एक म्हणजे भायखळ्यातील दगडी चाळ!

574

१९८०च्या दशकात मुंबईत अनेक चाळी उभ्या राहिल्या. मुंबईत गिरण्या सुरू असताना अनेक गिरणी कामगार चाळीत असणाऱ्या १० बाय १२च्या खोलीत कुटुंबासह वास्तव्यास होते. १० बाय १२च्या खोलीत राहून या गिरणी कामगारांची मुले मोठी झाली. आज मुंबईच्या चाळींतील बहुतांश मुले उच्च पदावर नोकरी करतात. अनेक जण या चाळी सोडून फ्लॅटमध्ये राहण्यास गेले असले, तरी त्यांची चाळीत राहण्याची ओढ काही कमी झालेली नाही. चाळीतील सार्वजनिक उत्सव, एकमेकांच्या मदतीसाठी धावणारे चाळकरी, चाळीतील भांडणे, मात्र त्यानंतर पुन्हा एकत्र येणे, या सर्व जुन्या आठवणी अजूनही अनेकांच्या डोळ्यासमोर जशाच्या तशा उभ्या राहतात. मुंबईतली या चाळींची जागा आता मात्र, टोलेजंग इमारती आणि टॉवर्सने घेतली आहे.

या टोलेजंग इमारतीत गुजराती मारवाड्यांनी आपले संसार उभे केले आणि येथील मराठी संस्कृती लुप्त पावली. ज्या चाळीच्या जागेवर या टोलेगंज इमारती उभ्या राहिल्या त्या बघून, त्याच चाळीत राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशांच्या डोळ्यात जुन्या आठवणींनी अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत.

चाळीचा बापमाणूस डॅडी

मुंबईत आता हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच चाळींचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे. येत्या काही वर्षांत उरल्या सुरल्या या चाळी देखील मुंबईतून नाहीशा होतील. त्यापैकीच एक म्हणजे भायखळ्यातील दगडी चाळ! दगडी चाळ म्हटलं की, अरुण गवळी हे एकच नाव चटकन लक्षात येतं. ही चाळ गाजली ती ९०च्या दशकात मुंबईत सुरू असलेल्या गँगवारच्या काळात. ही चाळ म्हणजे कुविख्यात गँगस्टर अरुण गवळीचे साम्राज्य असलेली चाळ! येत्या काही वर्षांत या चाळीच्या जागेवर देखील ४० मजल्याचे टॉवर्स उभे राहणार आहेत. या चाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, एक खाजगी बिल्डर या चाळीचा पुनर्विकास करत असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. अरुण गवळीच्या कुटुंबियांनी याला परवानगी देखील दिली असून, त्यांच्या स्वाक्षऱ्या देखील झालेल्या आहेत. म्हाडाने देखील या पुनर्विकासाला हिरवा कंदील दिलेला आहे.

दगडी चाळ

भायखळा पूर्वेला असलेल्या या दगडी चाळीत १० इमारती असून, त्यापैकी जवळजवळ ८ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या आहेत. ३८८ कुटुंबांचे या चाळीतील १० बाय १२च्या खोलीत संसार उभे आहेत. मूळचे मध्य प्रदेशातील गवळी कुटुंब भायखळा सात रस्ता स्थित दगडी चाळीत वास्तव्याला आले. अरुण गवळी हा मुंबईतील खटाऊ गिरणीत काम करत असताना, १९८० मध्ये तो बाबू रेशीम आणि रमा नाईक यांच्या संपर्कात आला. बाबू रेशीम आणि रमा नाईक हे त्याकाळी गँग चालवत होते. त्यावेळी रमा नाईक, बाबू रेशीम आणि गवळी हे दाऊद इब्राहिमला तस्करीमध्ये मदत करत होते. १९८८ मध्ये जोगेश्वरीतील एका जागेच्या वादातून दाऊद इब्राहिम याने रमा नाईक याची हत्या केली.

आणि त्याचवेळी उदय झाला नाईक टोळीच्या नव्या डॅडीचा…

(क्रमशः – कसे उभे केले अरुण गवळीने दगडी चाळीतले साम्राज्य? नक्की वाचा…)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.