गौरी-गणपती, शिमगा असो किंवा मग सलग आलेल्या सुट्ट्या असो, मुंबईतील चाकरमानी कोकणाची वाट धरतोच. वर्षातून ४-५ किंवा त्याहून अधिक वेळ गावाला जाणाऱ्या कोकणवासियांचे अनेकांना कुतूहल वाटते. मात्र कोकणात सतत जाणे या चाकरमान्यांना परवडते ते म्हणजे कोकण रेल्वेमुळे. वेळ आणि पैशाच्या दृष्टीने हा कोकण रेल्वेचा प्रवास किफायतशीर ठरतो. १९९८ पूर्वी कोकणात जाण्यासाठी केवळ एसटीचा पर्याय उपलब्ध होता. तेव्हा प्रत्येक कोकणवासी आपल्या दारी केव्हा रेल्वेगाडी धावेल याचे स्वप्न पाहत होता. परंतु मधु दंडवते, नाथ पै, जॉर्ज फर्नांडिस, ई. श्रीधरन यांसारख्या कर्तबगारांमुळे हे स्वप्न सत्यात उतरले. असमान्य धाडस आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोकण रेल्वेचा जन्म आहे. २६ जानेवारी १९९८ला कोकण रेल्वेचे लोकार्पण झाले. आज या कोकण रेल्वेच्या सेवेने २५व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्या निमित्ताने तिच्या जन्माची ही कहाणी…
( हेही वाचा : कोकण रेल्वे मार्गावर नवी दहा स्थानके! )
नाथ पै यांच्या प्रयत्नांमुळे १९६६ साली रेल्वे मंत्रालयाने दिवा-पनवेल मार्गाला मंजुरी दिली. त्यानंतर १९७७ ते १९७९ या कालावधीत मधु दंडवते रेल्वेमंत्री झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांतून पनवेल ते रोहा या पुढील रेल्वेमार्गाचे काम सुरू झाले. हे काम १९८६च्या दरम्यान पूर्ण झाले. पुरेसा निधी कोकण रेल्वेला उपलब्ध होत नव्हता ही प्रमुख समस्या होती. त्यानंतर १९८९ मध्ये जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाल्यावर या स्वप्नपूर्तीला गती मिळाली. रेल्वेमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी रेल्वे भवनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, बिहारमध्ये बाघा-चित्तौनी आणि दुसरा रेल्वे मार्ग कोकणात साकारण्याची माझी इच्छा आहे. फर्नांडिस यांना कोकण रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची इच्छा होती, परंतु एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी निधी उभारणे हे अत्यंत अवघड काम होते. मधू दंडवते यांनीही अर्थमंत्री म्हणून पाठिंबा दिला. अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आणि दक्षिण रेल्वेने हा सर्व्हे रिपोर्ट मंत्रिमंडळाला सुपूर्द केल्यानंतर या प्रकल्पाचे नाव कोकण रेल्वे असे ठेवण्यात आले. त्यानंतर मार्च १९९० मध्ये कोकण रेल्वे प्रकल्पाचा प्रारंभ झाला. याचे महत्त्वाचे पाऊल म्हणजे २६ जूलै १९९० रोजी कोकण रेल्वे महामंडळाची नोंदणी करण्यात आली.
ई. श्रीधरन हे रेल्वे बोर्डाचे सदस्य आणि बांधकाम क्षेत्रातील अनुभवी अभियंता होते. कोकण रेल्वेची संकल्पना अतिशय आव्हानात्मक होती, पण श्रीधरन यांनी आपले सगळे कौशल्य पणाला लावून हा प्रकल्प पूर्ण करण्यात मोठा वाटा उचलला.
760 किमीचा मार्ग; ७ विभाग
760 किमी या प्रकल्पाची सात विभागांमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यातील प्रत्येक टप्पा सुमारे 100 किमी लांबीचा होता. हे विभाग होते – महाड, रत्नागिरी, (उत्तर) रत्नागिरी (दक्षिण), कुडाळ, पणजी, कारवार आणि उडुपी.
अभियंत्यांसाठी आवाहानात्मक काम
सह्याद्रीच्या डोंगरातून मार्ग तयार करणे, माती भरावाचे काम, बोगदे आणि पुलांचा जास्तीत जास्त वापर, लोकवस्तीच्या भाग, फळबागांचे विशेषतः आंबा आणि काजूच्या बागांचे कमी नुकसान, राखीव आणि घनदाट जंगलांचे संरक्षण अशा अनेक गोष्टींची काळजी घेणे हे कोकण रेल्वेसमोर प्रमुख उद्दीष्ट होते. कोकण रेल्वेच्या अभियंत्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली. या रेल्वे मार्गात गोव्यात सर्वाधिक वळणे आहेत. डोंगरातून जाणारा हा मार्ग तयार करायचा असल्यामुळे हा प्रकल्प अतिशय जोखमीचा होता. पर्वत, डोंगर, घाट, जंगल, नद्या, दऱ्या पार करून कोकण रेल्वे टीमने अशक्यप्राय आव्हान पूर्ण केले. अखेर आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेची सर्व किनारपट्टी कव्हर करणारी गाडी धावली.
कोकणवासियांचे उत्तम सहकार्य
कोकण रेल्वेने या प्रकल्पात ज्यांची जमीन गेली त्या कोकणवासीयांना त्याचा चांगला मोबदला दिला. अनेकांची शेत जमिनही या प्रकल्पात गेली अशावेळी त्यांची समजूत काढणे कठीण होते. ज्यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीतही सामावून घेण्यात आले. भू संपदनाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आले. अर्थात कोकणवासियानीही यासाठी चांगले सहकार्य केले. प्रकल्पात ज्यांच्या फळबागा गेल्या त्यांना आंब्याच्या झाडासाठी सरासरी 2000 ते 10,000 रुपये, काजूच्या झाडांसाठी किमान 1000 ते 2000 रुपये तर फणसाच्या झाडांसाठी 2000 रुपये एवढी अंदाजे किंमत दिली गेली, असे कणकवलीतील प्रकल्पग्रस्त गौरव राणे यांनी सांगितले.
प्रमुख वैशिष्ट्य
- ७४१ किलोमीटर लांब रेल्वे मार्ग, यात महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक या चार राज्यांचा समावेश.
- एकूण १२ बोगदे, कारबुडे (जिल्हा रत्नागिरी) हा ६.५ किमीचा सर्वात लांब बोगदा.
- ७९ मोठे आणि १८९९ छोटे पूल
- होनावर रावती नदीवर २.०६५.८ मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल.