होलिकोत्सव : धार्मिक परंपरेशी जोडलेला सण 

267

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी अर्थात होलिकोत्सव साजरा केला जातो. देशभरात होळी अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होळी साजरी करण्याची प्रत्येक राज्याची पद्धत ही वेगवेगळी असली तरी त्यामागील उद्देश्य हा एकच आहे. वाईट विचार, दृष्ट प्रवृत्ती यांचा नाश करण्यासाठी होलिका दहन केले जाते. होलिका दहनानंतर वातावरण शुद्ध होते असे म्हटले जाते. होळी हा सण अनेक नावांनी ओळखला जातो. महाराष्ट्रात याला ‘शिमगा’, ‘हुताशनी’ , दक्षिणेत ‘कामदहन’,  बंगालमध्ये ‘दौलयात्रा’, उत्तरेत याला ‘दोलायात्रा’ असे देखील म्हटले जाते. होळीला बोंब मारण्याचीदेखील परंपरा आहे. या मागेही शास्त्र दडलेले आहे. मनातील दृष्ट प्रवृत्ती शमवण्यासाठी ही बोंब मारली जाते. होळीच्या दिवशी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. बोंब मारणे हा देवतेचा सन्मानच समजला जातो.

होळी संदर्भातील आख्यायिका

  • होळी संदर्भात अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी काही आख्यायिका तुम्हाला माहीत असतील तर काही तुमच्यासाठी नव्या असतील. जाणून घेऊया अशाच काही आख्यायिका
  • हिरण्यकश्यपू या दैत्याचा मुलगा म्हणजे प्रल्हाद. तो श्री विष्णूचा भक्त होता. हिरण्यकश्यपूला हे अजिबात आवडत नव्हते. त्याने त्याच्या मुलाला ठार मारायचे ठरवले. त्यासाठी आपल्या बहिणीलाच पाठवले. तिचे नाव होलिका. ती क्रूर होती. तिने प्रल्हादला मारण्यासाठी अग्निकुंड तयार केले. त्यात तिला प्रल्हादला भस्म करायचे होते. पण त्या आगीत तिचीच राख झाली. यानंतर होलिकादहनाला प्रारंभ झाला.
  • पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षस गावात शिरुन लहान मुलांना त्रास द्यायचे. रोगांची निर्मिती करायचे. त्याला गावाबाहेर हाकलून देण्यासाठी खूप प्रयत्न केले पण राक्षस काही जाईना. त्यावेळी नारदमुनींनी युधिष्ठीराला उपाय सांगितला. त्यानुसार लाकडे एकत्र करुन होलिका पेटवावी. त्याला प्रदक्षिणा घालून आपली इच्छा व्यक्त करावी. आनंदात लोकांनी आपल्या इच्छा मागाव्यात त्यामुळे राक्षस क्षीण होईल. त्यानुसार हा दिवस साजरा केला जातो.
  • होळीबद्दल दुसरी एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे एकदा भगवान शंकर तपश्चर्या करत होते. ते समाधी अवस्थेत असताना मदनाने त्यांच्या अंत:करणात प्रवेश केला. मला कोण चंचल करत आहे, असे म्हणत भगवान शंकराने जेव्हा डोळे उघडले त्यावेळी समोर मदनाला पाहून त्यांनी त्याला त्याच क्षणी भस्म केले. म्हणूनच दक्षिणेकडे लोक कामदेव दहन करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करुन तिचे दहन केले जाते. मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे, म्हणून होळीचा उत्सव आहे.

धूलिवंदन साजरी करण्यामागील कथा 

धूलिवंदन साजरी करण्यामागेही एक पुराणात कथा सांगितली जाते, असे म्हणतात की, द्वापारयुगात गोकुळात भगवान श्रीकृष्ण आपल्या गोपाळ संवंगड्यांवर पिचकारीने रंग उडवत व उन्हाची लाही कमी करत असत. तीच प्रथा आजही सुरु आहे. पूर्वी रंगाची उधळण केली तरी ते रंग नैसर्गिक असत. उन्हाचा दाह कमी करणे आणि वसंतोत्सव साजरा करणे हे यामागील कारण आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.