कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात यंदा कोरोना संकट निवळल्याने होळी सणाचा उत्साह वाढीस लागला आहे. मात्र, असं एक गाव आहे ज्या ठिकाणी ७१ वर्षांपासून कोणीही होळी, धुळवड खेळले नाही. ते गाव आहे आमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद.
काय आहे नेमकी घटना
परशराम महाराज यांनी या दिवशी देहत्याग केला होता. त्यामुळे या गावात होळी न पेटविण्याची परंपरा आहे. पिंपळोद हे गाव संत परशराम महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झाले आहे. नागरिकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. महाराजांनी फाल्गुन पौर्णिमेला देह ठेवला. त्यामुळे या गावात होळी पेटवली जात नाही आणि रंगपंचमीसुद्धा खेळली जात नाही. या घटनेला आज ७१ वर्षे पूर्ण झाली आहेत. दर्यापूर तालुका खारपाणपट्ट्याचा; मात्र महाराजांनी त्या काळात जलस्रोत दाखवून गोड पाण्याने गावकऱ्यांची तहान भागवली होती. आजही पाण्याचा अखंड झरा गावाच्या बाजूनेच ओसंडून वाहतो. त्यांनी वृक्ष कटाईला विरोध करीत गावकऱ्यांना वारंवार मार्ग दाखवले होते. त्यांच्या पश्चात लोकसहभागातून महाराजांचे समाधी मंदिर उभारण्यात आले. येथे महाराजांसोबत श्रीदत्त व भगवान गौतमबुद्धांची मूर्ती विराजमान आहे.
होळीच्या दिवशी दिवसभर मंदिरात मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. अत्यंत विलोभनीय रोषणाईने गावातील व आयटीआय येथील मंदिर डोळ्याचे पारणे फेडते. या वर्षीसुद्धा कोरोनाचे नियम पाळून अतिशय साध्यासोप्या पद्धतीने रंगपंचमीच्या दिवशी भालेगाव (ता. खामगाव) येथील अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विदर्भ उपाध्यक्ष ह.भ.प. शालिग्राम महाराज सुरडकर यांच्या मधुर वाणीतून काल्याचा कार्यक्रम होणार आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन ‘श्रीं’च्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. संत परशराम महाराज यांच्या जयघोषात गावांमधून दिंड्या-पालख्या मोठ्या उत्साहात महाराजांच्या पादुकांची मिरवणूक वारकरी गावामधून काढणार आहेत.
(हेही वाचा – बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर 200 हून अधिक लोकांच्या जमावाकडून हल्ला!)
महाराजांच्या सन्मानार्थ घातलेला हा निर्णय अर्थात वाढत्या प्रदूषणावर होणाऱ्या अतोनात खर्चावर एक प्रकारे अंकुश असेच म्हणावे लागेल. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गावाची मोलाची भूमिका आहे. गावकऱ्यांनी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त यंदाही समाजप्रबोधन कार्यक्रम ठेवला होता. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक राजेश वाघ झाडे यांच्या सहकार्यातून दरवर्षी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन घेतले जाते, असे पिंपळोद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश वाघाडे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community