Holi Festival 2024 : धार्मिक महत्त्व आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत

वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. उत्तर भारतात याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेतील केरळमध्ये कामदहन (कुमानी पुन्नमी/काम पौर्णिमा) अशा संज्ञा आहेत.

333
Holi Festival 2024 : धार्मिक महत्त्व आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत
  • चेतन राजहंस

होळी हा उत्सव देशपरत्वे फाल्गुन पौर्णिमापासून पंचमीपर्यंत ५ ते ६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. उत्तर भारतात याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेतील केरळमध्ये कामदहन (कुमानी पुन्नमी/काम पौर्णिमा) अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा, असममध्ये दौल उत्सव, बिहारमध्ये फगुवा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल. सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न-भिन्न असली, तरी त्यामागील उद्देश मात्र सारखाच असतो. होळीचा उद्देश, होळीचे महत्त्व, तो साजरा करण्याची पद्धत, होळीची रचना तसेच कचऱ्याच्या होळीपेक्षा पारंपरिक धार्मिक पद्धतीने होळी का साजरी करावी? होळी पेटवल्यावर बोंब का मारावी ? याविषयीची माहिती जाणून घेऊ. (Holi Festival 2024)

(हेही वाचा – Holi Festival 2024 : यंदा बाजारात आल्या मोटू पतलू, बार्बी, स्पायडर मॅनच्या पिचकारी)

होळीचा इतिहास : सण साजरा करण्यामागील आख्यायिका

१. पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसिणी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना. ‘नगरातील मुलांना त्रास देणाऱ्या ‘ढुंढा’ नावाच्या राक्षसिणीचा प्रतिकार कसा करावा?’, याविषयी नारद मुनी सम्राट युधिष्ठिराला पुढील उपाय सांगतात. ते युधिष्ठिराला म्हणतात, ‘नगरातील सर्व लोकांना तू अभय दे. त्यामुळे ते आनंदित होतील. त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देत. (Holi Festival 2024) त्यानंतर –
सञ्चयं शुष्ककाष्ठानाम् उपलानां च कारयेत् । तत्राग्निं विधिवत् बुद्ध्वा रक्षोघ्नैः मन्त्रविस्तरैः ॥
ततः किलकिलाशब्दैः तालशब्दैः मनोरमैः । तम् अग्निं त्रिः परिक्रम्य गायन्तु च हसन्तु च ॥
जल्पन्तु स्वेच्छया लोकाः निःशङ्का यस्य यन्मनः । तेन शब्देन सा पापा होमेन च निराकृता ॥
अदृष्टिघातैः डिम्भानां राक्षसी क्षयम् एष्यति । सर्वदुष्टापहो होमः सर्वरोगोपशान्तिदः ॥
क्रियतेऽस्यां द्विजैः पार्थ तेन सा होलिका स्मृता । – भविष्योत्तरपुराण
अर्थ : वाळलेली लाकडे आणि गोवऱ्या यांचा ढीग रचावा. तेथे रक्षोघ्न (राक्षसांना नष्ट करणाऱ्या) मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करावा. त्यानंतर लहान मुलांप्रमाणे हर्षभरित शब्द करत (किलकिलाशब्दैः), मनोरम अशा टाळ्या वाजवत (तालशब्दैः मनोरमैः) अग्नीला ३ प्रदक्षिणा घालून गाणे गावे आणि आनंदाने हसावे. लोकांनी निःशंकपणे आणि स्वेच्छेनुसार त्यांच्या मनातील पाहिजे तेवढे बोलावे. अशा आनंदी शब्दांनी आणि होमाने लहान मुलांना त्रास देणारी ती पापी राक्षसीण लोकांची दृष्टी पडल्याविनाच क्षीण होईल. हे राजा! फाल्गुन पौर्णिमेला सर्व दुष्ट शक्ती पळवून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात; म्हणून या तिथीला विद्वानांनी ‘होलिका’ असे म्हटले आहे.
या श्लोकांत अग्नीला प्रदक्षिणा घालताना कुठेही शिवीगाळ करावी, असा उल्लेख नाही. याउलट ‘किलकिल’, ‘मनोरम तालशब्द’ असे शब्द आले आहेत. यांचे अर्थ वर दिले आहेत.
२. ‘उत्तरेमध्ये होळीच्या आधी तीन दिवस कृष्णाला पाळण्यात निजवतात आणि त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पूतना राक्षसीची प्रतिकृती करून ती रात्री पेटवतात.
३. एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असताना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.
‘ओरिसामध्ये तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात. प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून गुलाल उधळतात. ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्याच्याभोवती टिपऱ्या खेळतात.’ (Holi Festival 2024)

(हेही वाचा – Indian Navy: सागरी क्षेत्रातील धोक्यांना तोंड देण्यासाठी भारतीय नौदलाने राबवली १०० दिवसांची मोहीम, वाचा सविस्तर…)

होळीची रचना कशी करावी?

पूजनाचे स्थान शेणाने सारवून, तेथे रांगोळी काढणे. मधोमध एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. त्याच्या भोवती गोवऱ्या आणि सुकी लाकडे रचावी. कर्त्याने शुचिर्भूत होऊन आणि देशकालाचा उच्चार करून ‘सकुटुम्बस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनमहं करिष्ये ।’ असा संकल्प करावा. नंतर पूजा करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ‘होलिकायै नमः ।’ असे म्हणून होळी पेटवावी. होळीला प्रदक्षिणा घालावी आणि पालथ्या हाताने बोंब मारावी. होळी पूर्ण जळल्यानंतर दूधाचा प्रसाद द्यावा. नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. संपूर्ण रात्र नृत्यगायनात व्यतीत करावी. (Holi Festival 2024)

होळी साजरी करताना काय करावे, काय करू नये?
  • आदर्श होळी अशी साजरी करा ! होळी आणि रंगपंचमी यांतील अपप्रकार रोखा !
  • ‘एक गाव किंवा एक वॉर्ड, एक होळी’ अशी होळी करा ! कचऱ्याची होळी करू नका, मोठी होळी करू नका !
  • चांगले वृक्ष न तोडता, वाळलेली लाकडे वापरा ! लाकूड, गोवऱ्या किंवा इतर वस्तू चोरू नका !
  • होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून उपस्थितांना नंतर तो प्रसाद म्हणून द्या ! स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांना पाहून अश्लील अंगविक्षेप करणे किंवा त्यांच्याशी असभ्यपणा करू नका !
  • राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी शक्ती मिळावी, अशी सामूहिकरित्या प्रार्थना करा ! पाण्याचे फुगे फेकून मारणे, तसेच आरोग्याला घातक असणारे रंग अंगाला फासणे टाळा !
  • पारंपरिक वेशभूषा करा, ग्राम देवता आणि स्थान देवता यांच्या दर्शनासाठी जा! कर्णकर्कश आवाजात चित्रपट गीते लावणे, मद्यपान करणे, रेन डान्स आयोजित करू नका ! (Holi Festival 2024)
(लेखक सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.