Holi Festival 2025 : एरंडाची होळी अन् खरपुस पुरणपोळी

94
Holi Festival 2025 : एरंडाची होळी अन् खरपुस पुरणपोळी
  • सयाजी झुंजार
भारतामध्ये साजऱ्या होणाऱ्या सर्व सणांना फार महत्त्व आहे. त्यातून महाराष्ट्रात मराठी माणसांचे जे मराठी सण आहेत, ते तर अतिशय परंपरागत आणि वेगळेपण दर्शवणारे आहेत. असाच एक सण म्हणजे होळी, त्याला ‘शिमगा’ असेही म्हणतात. महाराष्ट्रातील इतर प्रांतांप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रात होळीचा सण अतिशय आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येक प्रांतातील प्रथा-परंपरा वेगवेगळ्या असतात. येथे पश्चिम महाराष्ट्रात होळीचा सण कशा प्रकारे साजरा केला जातो, हे दिले आहे. अतिशय छोट्या ग्रामीण भागासह शहरांमध्ये प्रत्येक घरामध्ये गायी-म्हशी असतात. त्याचबरोबर त्यांच्या शेणापासून शेणी तयार करतात, प्रत्येक कुटुंब आपल्या घरासमोर पाच, सात, नऊ, अकरा अशा विषम आकड्यांमध्ये शेणी घेऊन होळी रचतात. (Holi Festival 2025)
होळीमध्ये एरंड नावाची एक वनस्पती असते. ती मधोमध उभी केली जाते. ‘एरंड हे पांडवांचे प्रतीक आहे आणि होळी पेटवल्यानंतर तो एरंड ज्या बाजूला झुकतो, त्या बाजूला प्रचंड पाऊस पडतो’, अशी कथा जुन्या लोकांकडून सांगण्यात येते. अलीकडे कुटुंबाबरोबर प्रत्येक गल्लीतील मंडळेसुद्धा होळीचा सण साजरा करतात. घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या घरातून पाच-पाच शेण्या गोळा करतात आणि त्या शेण्या एकत्र करून त्याची मोठी होळी केली जाते. त्याच्यामध्ये मोठे एरंडाचे झाड उभे केले जाते. त्या त्या गल्लीतील, मंडळातील मुले त्या होळीच्या भोवती तोंडावर हात घेऊन खूप बोंबलतात आणि होळीच्या भोवती फेऱ्या मारतात. (Holi Festival 2025)
लहान मुले टिमक्या घेऊन गावभर फिरतात. होळीमध्ये होळीच्या सणासाठी केलेली पुरणपोळी अर्पण केली जाते. अशा आठ-दहा पुरणपोळ्या त्या होळीवर ठेवल्या जातात. त्याचा एक खरपूस सुगंध पसरतो. त्या सगळ्या पुरणपोळ्या एकत्र करून प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जाते.  होळीच्या आधी प्रचंड थंडी असते. होळीनंतर ती थंडी जळते, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. खरेच होळीनंतर उन्हाळ्याला सुरुवात होते. त्या दिवशी अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांनाच तोंडावर हात घेऊन बोंबलण्याची परवानगी असते. त्याचे कारण कोणीच सांगू शकत नसले, तरी बोंब मारणे केवळ होळीच्या दिवशी सामान्य समजले जाते. होळीच्या भोवतीने फिरत फिरत बोंबा मारणे ही फार वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. अलीकडे गावातील ग्रामदैवतेसमोर मोठी होळी केली जाते. गावातील गुरव सर्वांच्या वतीने त्या होळीचे पूजन करतो आणि ग्रामदैवताला प्रार्थना करतो, ‘या गावावर येणारे कुठलेही संकट या होळीमध्ये जळून जाते आणि इथून पुढे गाव सुखी आणि समृद्ध होऊ दे.’ प्रार्थना झाल्यानंतर होळी पेटवली जाते.  (Holi Festival 2025)
(लेखक महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)
हेही पहा –  https://www.youtube.com/watch?v=uxs5JMBoExU
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.