Holi Festival 2025 : पालखी, निशाण आणि कोकणातील शिमगा

40
Holi Festival 2025 : पालखी, निशाण आणि कोकणातील शिमगा
  • धनराज साळवी

देशात होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावे आहेत. मात्र, महाराष्ट्रात इतर सर्व ठिकाणी होळी जरी म्हटले जात असेल, तरी कोकणात शिमगा या नावानेच मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. दरम्यान होळी चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. कोकणातल्या होळीचा सण पारंपरिक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा होत असे. या लाल मातीच्या गाभ्यात उभ्या केलेल्या नारळी पोफळी-आंबारूपी होळीच्या ज्वाळा अंधार भेदून गगनाला भिडू पहातात. त्या वेळी कोकणी माणसांना वर्षभराची ताकद यामधून मिळालेली असते. तसेच बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात, त्या होळी सणाला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. मात्र कोकण पट्ट्यातील रत्नागिरी जिल्ह्यात मात्र शिमगा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. शिमगा म्हटला की, कोकणी माणसाच्या अंगात संचारतं, असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. शिमग्याची पालखी त्याच्या डोक्यात नाचायला लागते, बोंबा कानात घुमायला लागतात. मग त्याला वेध लागतात, ते आपल्या मूळ गावी जायचे. (Holi Festival 2025)

फळांचा राजा आंबा, तसेच सुपारी काजू, नारळी-पोफळीच्या बागांनी समृद्ध असणाऱ्या कोकणात शिमगा साजरा करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, मंडणगडसह चिपळूण, गुहागर, संगमेश्वर आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी फाल्गुन शुक्ल पंचमीला रात्री पारंपरिक ‘फागगीत’ गात शेवरीच्या झाडाची पहिली होळी पेटवली जाते आणि नंतर पुढचे काही दिवस गावात ग्रामदैवतेची पालखी चिरा-कौलांच्या वाड्या-वस्त्यांमधून पारंपारिक वाद्य वाजवत फिरवली जाते. काही ठिकाणी आधी ग्रामदैवतांच्या पालख्या फिरतात आणि त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी होम पेटवला जातो. प्रामुख्याने रत्नागिरीमधील काही गावात शिमगा हा सण तीन, पाच, सात किंवा त्याहून अधिक दिवस चालतो. (Holi Festival 2025)

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या रस्ते विभागाच्या कार्यालयासाठीच सल्लागार नेमण्याची आली वेळ)

अशी असते कोकणातील होळी

दापोली तालुक्यातील विसापूर गावाचे ग्रामस्थ प्रमोद सुर्वे सांगतात की, गणपतीनंतर कोकणात नवचैतन्य आणणारा सण म्हणजे होळी. गुहागर, श्रीवर्धनपासून चिपळूण ते अगदी रत्नागिरीपर्यंत होळीला एकच धम्माल असते. गणपतीपेक्षा होळीला या भागात खूप जास्त महत्त्व आहे. विसापूर गावातील होळी ही पंचमीला सुरू होऊन रंगपंचमीला समाप्त होते. होळी ही मोठ्या जल्लोषात पारंपारिक वाद्य वाजवत ‘फागगीत’ गात मूठ आवळून तोंडावर नेत बो बो बो… बोंब मारत होम पेटवला जातो. काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम’ असे देखील म्हटले जाते. तत्पूर्वी होम जाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उंच लाकडाला ‘हलकुंड’ असे म्हटले जाते. हा ‘हलकुंड’ धूळवडीच्या आदल्या दिवशी गावच्या वेशीवरून वाजतगाजत आणत त्याची सुवासिनी महिलांकडून पूजा केली जाते. मध्यरात्रीनंतर होम लागतो, त्या ठिकाणी जमिनीत चर खोदून हे हलकुंड उभे करून होम सजवला जातो. त्यानंतर पहाटे वाडीतील गावकरी, मानकरी, खेळे आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत हा होम पेटवला जातो. (Holi Festival 2025)

बहीण भावाची भेट आणि निशाण भेटवणे

दुपारच्या वेळी पालखीवर रंगीत पासोडा नेसवत आणि १०० ते १५० फुट उंच निशाण सजवून पंचक्रोशीच्या मध्यभागी म्हणजेच दापोली तालुक्यातील जामगे तळ्याचा कोंड या ठिकाणी सहाण भरते. या सहाणेवर पंचक्रोशीतील श्री जननी देवी सातेरे, श्री सोमजाई देवी जामगे, श्री काळंबा देवी शिरसाडी, श्री भैरी देव विसापूर (विश्रांतीनगर) आणि विसापूर मोरेवाडी मधील श्री काळकाई देवी पालखीसह त्यांचे निशाण अंगावर खांद्यावर नाचवत सहाणेवर आणले जाते. या वेळी सोबतीला आणलेले निशाण उभे करत आकाशात एकमेकांना भेटवले जातात. हे निशाण म्हणजे बहीण-भाऊ एकमेकांना भेटतात, अशी आख्यायिका आहे. ही जुनी परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. परतीच्या प्रवासाच्या सुरुवातीला पुन्हा पालखी आणि निशाण एकमेकांना भेटवून जड अंत:करणाने पाचही पालख्या आपल्या गावात परततात, तर पुन्हा या बहीण भावाची भेट ही एक वर्षाने होते. (Holi Festival 2025)

(हेही वाचा – Legislative Assembly : विवाहित महिलांपुढे प्रश्न; नाव लावायचे कुणाचे? आईचे की नवऱ्याचे की दोघांचे??)

गाऱ्हाणे आणि ओटी भरण्याची परंपरा

धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी पालखी पहिल्या पाच मानकऱ्यांच्या घरी भेट देते. नंतर गावातील सर्वांच्या घरी अगदी रात्री उशिरापर्यंत जात असते. या वेळी सर्व माहोल आनंददायी असतो. घरोघरी गुरव बुवा गाऱ्हाणे घालताना म्हणतात… “बाय माझे आई काळकाई सालाबादची ही ओटी… नारलान, तांदळानं, पैशाने, फुलानं, पासोडा साडीचोळीनी तुझी ओटी भरलेली आहे. ती ओटी तू मान्य करून घे आणि त्यांच्या घरा-दारात मुला-बाळात संसारधंद्यात सर्व क्षेत्रांमध्ये सांभाळ कर आणि ही ओटी मान्य करून घे… अशी ओटी भरून साकडं किंवा नवस फेडला जातो. (Holi Festival 2025)

ग्रामदैवताची पालखी खांद्यांवर नाचवण्याची बातच न्यारी

पालखी नाचवताना पाहणं हा डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण असतो. यासाठी अनुभवी ग्रामस्थ डोक्यावर पालखी घेऊन बेभान होऊन नाचतात. गावाच्या वेशीवर आजूबाजूच्या गावातील ग्रामदेवता एकमेकींना भेटण्यासाठी येतात. या वेळी पालखी नाचवताना त्या एकमेकींची ओटी भरतात, असं म्हटलं जातं. यासाठी पालखी नाचवताना पालख्यांमधील ओटीचे खण, नारळ बदलण्यात येतात. पालखी नाचवण्याचा प्रकार प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार निरनिराळा असतो. त्यामुळे पालखी नाचवताना पहाण्यासाठी प्रत्येक गावचे ग्रामस्थ इतर गावांमध्येदेखील जातात. (Holi Festival 2025)

(हेही वाचा – Balochistan Liberation Army ने १०० हुन अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा; सरकारने २००हुन अधिक रिकाम्या शवपेट्या घटनास्थळी पाठवल्या)

चिपळूण, मंडणगडमध्ये ‘ही’ अनोखी पद्धत प्रचलित

चिपळूण, मंडणगडमध्ये पालखी नाचवणे आणि देवावरची श्रद्धा असा अनोखा संगम पाहायला मिळतो. मोकळ्या चव्हाट्यावर एका ठिकाणी नारळ पुरला जातो आणि तो पालखीने शोधून काढायचा. खुल्या मैदानात पालखीच्या नाचाला उधाण येते… खांदेकरी अशा काही लकबीने पालखी नाचवतात की, एक क्षण आपल्याला वाटते की, ती निसटणार तर नाही, पण हवेत हलकाच झोक घेत ती पुन्हा खांद्यावर स्थिरावते, तसेच मोराच्या पिसासारखी भासणारी पालखी अचानक जड जड होत जाते आणि खांदेकऱ्यांच्या तालावर नाचण्याऐवजी तीच त्यांना घुमवायला सुरुवात करते. खेचत खेचत खांदेकऱ्यांनाच पालखी नारळ पुरलेल्या ठिकाणी घेऊन जाते आणि तिचा खूर आपटला जातो… पुरलेला नारळ सापडतो! अशी ही अनोखी पद्धत फार पूर्वीपासून प्रचलित आहे. (Holi Festival 2025)

कॅलिफोर्निया होईल पण…

कोकणाचा कॅलिफोर्निया होईल, तेव्हा होईल पण पोटासाठी दाही दिशा पसरलेल्या कोकणी माणसाला आजही लाल मातीची, आपल्या कौलारू घराची, पडिक बनलेल्या जमिनीची ओढ लागते ती जत्रा, गणपती आणि होळीच्या निमित्ताने. तेच आज त्याच्या उरल्यासुरल्या संस्कृतीचे पाइक बनले आहेत. (Holi Festival 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.