होमगार्ड करणार नैसर्गिक आपत्तीचा सामना

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्यात गृहरक्षक (होमगार्ड)चे जवान तैनात करण्यात येणार आहेत. राज्य गृहरक्षक दलाच्या १८०० जवानांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एसडीआरएफ) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे जवान यंदाच्या मान्सूनमध्ये प्रत्येक जिल्ह्यात तैनात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. भूषण उपाध्याय यांनी दिली. विशेषतः हे जवान अतिवृष्टी होऊन बाधित झालेल्या विभागात तैनात करण्यात येणार असल्याचे उपाध्याय यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा : बेस्ट कामगारांची भोजन व्यवस्था पूर्वीप्रमाणे करा; अन्यथा भाजपने दिला आंदोलनाचा इशारा)

प्रत्येक जिल्ह्यात सुमारे २०० प्रशिक्षित गृहरक्षक जवान

गृहरक्षक दलात असलेल्या राज्यभरातील १८ ते ३५ वयोगटात असलेल्या जवानांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेली आहे. या जवानांना राज्याच्या आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एसडीआरएफ) प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती महासंचालक उपाध्याय यांनी दिली. गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. बी.के उपाध्याय म्हणाले, “मान्सून येण्यापूर्वी, प्रत्येक जिल्ह्यात सुमारे २०० प्रशिक्षित गृहरक्षक जवान नियुक्त केले गेले आहेत आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना मदत करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ते तैनात केले जातील.”

प्रशिक्षित जवान हे रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली यांसारख्या भागात विशेषत: कोकण पट्ट्यातील ज्या ठिकाणी पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी हे जवान तैनात केले जातील. गेल्या दशकात, नैसर्गिक आपत्तीच्या अनेक घटना घडल्या आहेत, पुरामुळे मृत्यू झाला आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये नैसर्गिक आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी गृहरक्षक दलाच्या प्रशिक्षित जवानांची मदत होऊ शकते असे उपाध्याय यांनी म्हटले आहे.

प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांसह पाच दिवसांचे प्रशिक्षण

गृहरक्षक दलाच्या जवानांना भूस्खलनाच्या वेळी लोकांना मदत करणे आणि परिस्थिती नुसार खबरदारीचे उपाय करणे, बोटींचे प्रकार आणि बोटींचे मार्ग, वेगवेगळ्या दोरी आणि गाठींचे प्रकार आणि वापर, यासारखी सर्व आवश्यक कौशल्ये शिकवली जातील. लाइफ जॅकेट वापरणे तसेच पाण्याची गती समजून घेणे, तराफा वापरणे, वॉकी-टॉकी वापरणे आणि प्राथमिक उपचार करणे यासारखी मूलभूत कौशल्ये आणि बाधित लोकांना जवळच्या रुग्णालयामध्ये घेऊन जाणे प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांसह हे पाच दिवसांचे प्रशिक्षण आहे, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला (एनडीआरएफ) बोलावले जाते. पण त्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी काही तास लागतात. म्हणून, एनडीआरएफ च्या धर्तीवर, राज्याचे एसडीआरएफ प्रत्येक राज्यात तयार केले गेले जे नैसर्गिक आपत्तींना प्रतिसाद देण्यासाठी एक विशेष दल आहे, यापुढे एसडीआरएफच्या मदतीला गृहरक्षक दलाचे जवान देखील असतील असे वरिष्ट अधिकारी यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here