परमबीर सिंग आणि सचिन वाझे भेट! काय म्हणाले गृहमंत्री?

125

न्या. चांदीवाल आयोगाच्या दालनाबाहेर झालेल्या वाझे आणि परमबीर सिंग यांच्या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेप्रकरणी तसेच रजेवर असताना कुठलीही सूचना न देता सरकारी वाहनाचा वापर केल्याप्रकरणी, परमबीर सिंग यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान मंगळवारी सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उलटतपासणीसाठी न्या. चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यात आले होते. या दरम्यान वाझेे याने देशमुख यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता आयोगाने वाझेला खडसावले.

मुंबई ठाण्यात खंडणीचे पाच गुन्हे दाखल असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे २३१ दिवसानंतर मुंबईत प्रकट झाले होते. परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी वसुली प्रकरणाची चौकशी न्या. चांदीवाल आयोग करीत आहे. या प्रकरणात सिंग हे सोमवारी सकाळी आयोगाला चौकशीला सामोरे गेले, दरम्यान आयोगाकडे सचिन वाझे याची उलटतपासणी सुरू असून त्याला देखील तळोजा तुरुंगातून आयोगासमोर हजर करण्यासाठी आणण्यात आले होते. यावेळी परमबीर सिंग आणि सचिन वाझे आयोगाच्या दालनाबाहेर समोरासमोर आले होते.

(हेही वाचा पुलाचे काम स्थगित तरी ३ महिने बॅरिकेड्सने रस्ता बंद! भाजपाचे आंदोलन)

पोलिसांना खडसावले

या वेळी त्यांच्यात १० मिनिटे चर्चा झाली होती. दोघांत झालेल्या भेटीची आणि बातचीतची चर्चा तपास यंत्रणांमध्ये सुरू होती. या भेटीची दखल घेण्यात आलेली असून या भेटीची आणि परमबीर सिंग रजेवर असताना कुठलीही पूर्व सूचना न देता सरकारी वाहन वापरल्या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली. न्या. चांदीवाल आयोगासमोर झालेली भेट आणि त्यांच्यात झालेल्या १० मिनिटे चर्चेबाबत आयोगाने वाझेला घेऊन येणाऱ्या पोलिसांना खडसावले आहे. तसेच या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेची आणि सिंग यांनी होमगार्ड महासंचालक पदाचा पदभार न स्वीकारता तपास यंत्रणेकडे चौकशीसाठी जात असताना सरकारी वाहन वापरल्याची दखल गृहमंत्रालयाने घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.

वाझे-देशमुखही भेट झालेली

मंगळवारी परमबीर सिंग, मनी लॉन्डरिंग गुन्हयात आर्थर रोड तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि तळोजा तुरुंगात असलेला बडतर्फ अधिकारी सचिन वाझे हे न्या. चांदीवाल आयोगासमोर उलट तपासणीसाठी हजर झाले होते. या दरम्यान सचिन वाझे आणि देशमुख हे आयोगाबाहेर जवळपास १० मिनिटे एकाच खोलीत होते. या दरम्यान दोघांमध्ये काय बोलणे झाले याबाबत कळू शकले नाही. न्या. चांदीवाल आयोगाने वाझे व सिंग यांच्या आयोगाच्या बाहेर झालेल्या भेटीबाबत वाझे याला घेऊन येणाऱ्या पोलिसांना खडसावले आहे. १३ डिसेंबर रोजी वाझेला पुन्हा आयोगासमोर हजर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.