कांदिवली लालजी पाड्यात घराचा भाग कोसळला: चार वर्षीय मुलाचा मृत्यू, ०५ जखमी

104

कांदिवली लालजी पाडा येथील एका छोट्या रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्या कडेला असलेल्या एक मजली बांधकामाला धक्का पोहोचून ते कोसळले. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

बांधकामाचा भाग कोसळला 

कांदिवली पश्चिम लालजी पाडा येथील शिंपोली टॉवर जवळी के. डी कंपाउंड एका छोट्या रस्त्याचे काम महापालिकेच्या आर दक्षिण विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. हे काम सुरू असताना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास एक मजली घराच्या बांधकामाचा भाग कोसळला. या दुर्घटनेत तीन महिन्यांच्या बालकासह सहा जण जखमी झाले.

यात चार वर्षीय नौशाद अली या जखमी मुलाचा मृत्यू झाला आहे. कांदिवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  या रुग्णालयात दाखल केलेल्या शाहिदुनिस्सा इरफान मुल्ला(४५) यांच्यावर उपचार करून घरी सोडून देण्यात आले.

कांदिवलीतील ट्रायडेंड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या हसीना शाह(२२),प्रेमा यादव(३८) व मोहमद अन्सार यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर तीन महिन्यांच्या दिलशाद शाह याला मालाडच्या बाल रुग्णालयात दाखल केले असून त्याचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.