कशी होते मान्सून वा-यांची निर्मिती? भारत आणि महाराष्ट्रात कसा पडतो प्रभाव?

हे वारे नेमके तयार कसे होतात, त्यांचा नेमका प्रवास देशभर कसा होतो?

जून महिना सुरू झाला की आपल्याला आशा असते ती पावसाच्या आगमनाची. उकाड्याने हैराण झाल्यामुळे आपण पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात नैऋत्य मान्सून वा-यांमुळे सर्वात जास्त पाऊस पडतो, हे आपण लहानपणापासून शिकत आलो आहे. पण हे वारे नेमके तयार कसे होतात, त्यांचा नेमका प्रवास देशभर कसा होतो?

जूनपासून होते मान्सूनची एंट्री

‘मान्सून केरळ मध्ये दाखल’, दरवर्षी पाऊस सुरू व्हायच्या आधी वर्तमानपत्रातून किंवा न्यूज चॅनलवरुन आपण हे पाहतो. अरबी समुद्राच्या किना-याला लागून असलेल्या राज्यांत मान्सून पहिल्यांदा हजेरी लावतो. मान्सून वारे हे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहत असल्याने, त्याची पहिली धडक भारताच्या मुख्य भूमीवर दक्षिणेकडील केरळ या राज्यात होते. साधारणपणे 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो.

अशी होते मान्सूनची निर्मिती

मार्चनंतर सूर्य विषुववृत्तावरुन उत्तरेकडे सरकू लागल्याने उत्तर गोलार्धात सूर्याची लंबरुप किरणे पडतात. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. पण याचवेळी दक्षिण गोलार्धात सूर्याची तिरपी किरणे पडत असल्याने तिथे थंड वातावरण असते. त्यामुळे तिथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण झालेला असतो. वारे हे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असतात. आता भारताच्या दक्षिणेकडे हिंदी महासागर पसरलेला असल्यामुळे तिथल्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वाहत येणारे वारे हे बाष्पयुक्त असतात. त्यामुळे ते जेव्हा भारताच्या मुख्य भूमीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा उत्तर-दक्षिण पसरलेल्या पश्चिम घाटावर हे बाष्पयुक्त ढग आदळून खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस देतात. म्हणूनच मान्सून वा-यांमुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या काही प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.

मान्सूनचा प्रवास

भारतात मान्सूनचा काळ साधारणपणे जून ते सप्टेंबर इतका असतो. या काळात नैऋत्य मोसमी वा-यांमुळे देशात पाऊस पडतो, तर सप्टेंबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मोसमी वा-यांमुळे देशाच्या काही भागात पाऊस पडतो. 1 जून ते 15 सप्टेंबर पर्यंतचा काळ हा भारतात नैऋत्य मान्सूनचा काळ म्हणून मानला जातो. तर 15 सप्टेंबर ते 1 डिसेंबर पर्यंतचा काळ ईशान्य मान्सूनचा असतो. यालाच परतीचा मान्सून असे सुद्धा म्हणतात. ईशान्य वारे हे जमिनीवरुन वाहत असल्यामुळे ते कोरडे असतात, त्यात बाष्पाचे प्रमाण कमी असते. म्हणून ईशान्य मोसमी वा-यांपासून भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत नाही. फक्त बंगालच्या उपसागरावरुन वाहणा-या वा-यांनी थोड्या प्रमाणात बाष्प गोळा केले असल्याने, त्यांच्यापासून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत पाऊस पडतो.

देशातील ऋतूंची नावे

 • मार्च ते एप्रिलः वसंत ऋतू
 • मे-जूनः ग्रीष्म ऋतू
 • जुलै-ऑगस्टः वर्षा ऋतू
 • सप्टेंबर-ऑक्टोबरः शरद ऋतू
 • नोव्हेंबर-डिसेंबरः हेमंत ऋतू
 • जानेवारी-फेब्रुवारीः शिशिर ऋतू

आपल्या पृथ्वीचा आस 23.5 डिग्री कलल्यामुळे ऋतूंची निर्मिती होते.

मान्सूनची नावे

नैऋत्य मान्सूनला काही राज्यांमध्ये विशेष नावं देण्यात आली आहेत.

 • महाराष्ट्र(कोकण पट्ट्यात)- आम्रसरी
 • केरळ व तामिळनाडू- चेरी ब्लॉसम किंवा कॉफी शॉवर
 • ओडिशा- कालबैसाखी
 • आसाम- चहा बहार

महाराष्ट्रात असा असतो मान्सूनचा प्रभाव

महाराष्ट्रातील उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्री पर्वतामुळे बाष्पयुक्त ढग अडवले जातात. त्यामुळे महाराष्ट्रात प्रतिरोध पर्जन्यामुळे मोठ्या प्रमाणावर नैऋत्य मान्सून वा-यांमुळे पाऊस पडतो.

 • महाराष्ट्रात कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर नैऋत्य मान्सून वा-यांमुळे 250 सेमी. पेक्षा जास्त पाऊस पडतो.
 • कोकणात सिंंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या पूर्ण जिल्ह्यांत तसेच नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागात 300 सेमी. पेक्षा जास्त पाऊस पडतो.
 • घाटमाथ्यावरील गगनबावडा(कोल्हापूर), महाबळेश्वर(सातारा), आंबोली(सिंधुदुर्ग), माथेरान(रायगड), खंडाळा व लोणावळा(पुणे) इथे प्रतिरोध पर्जन्यामुळे सर्वाधिक पाऊस  पडतो.
 • महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. कारण ढगांमधील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने ते कोरडे होत जातात.
 • म्हणूनच घाटमाथा ओलांडल्यानंतर पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग. तसेच नाशिक, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण 30 ते 40 सेमी. असते. म्हणूनच या प्रदेशाला ‘अवर्षणग्रस्त प्रदेश’ असे म्हटले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here