टायटॅनिक जहाज कसं बुडालं? वाचा टायटॅनिकची खरीखुरी स्टोरी…

659

सर्वांनी टायटॅनिक हा चित्रपट पाहिला असेल. कदाचित नवीन पिढीचा हा चित्रपट पाहायचा राहून गेला असेल. टायटॅनिक बुडाली या सत्य घटनेचा संदर्भ घेऊन अतिशय उत्कृष्ट असा रोमॅंटिक चित्रपट निर्माण करण्यात आला होता.

हा नव्वदच्या दशकातला सुपरहिट आणि अप्रतिम चित्रपट होता. तरी अनेकांना असा प्रश्न पडतोच की नक्की काय झालं असेल? ते जहाज कसं बुडालं असेल? कारण ही साधीसुधी घटना नव्हती. याची दखल जगाने घेतली आणि म्हणूनच तर निर्मात्यांना यावर चित्रपट काढावासा वाटला.

( हेही वाचा :पश्चिम व मध्य रेल्वेच्या सुविधांमध्ये भेदभाव का? )

खरं टायटॅनिक जहाज कसं होतं?

दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आज लोकांना खरं टायटॅनिक जहाज लक्षात नसून केवळ चित्रपट लक्षात आहे. खरं टायटॅनिक जहाज १७ मजली इमारत एवढं उंच होतं. ३ फुटबॉलच्या मैदानाइतकं मोठं म्हणजेच सुमारे ३५०० लोक त्यात प्रवास करु शकत होते. हे जहाज तयार व्हायला २६ महिने लागले. ३००० पेक्षा जास्त लोकांनी मिळून हे जहाज तयार केलं होतं.

गंमत म्हणजे हे जहाज तयार झाल्यावर ते पाहण्यासाठी १ लाख लोक जमले होते. इंग्लंडच्या साऊथम्पटन शहरातून आपला पहिला प्रवास सुरु केला आणि हा शेवटचा प्रवास ठरला. नॉर्थ ऍटलांटिकमध्ये हे जहाज बुडालं. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण १५०० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. जगातल्या सर्वात भयानक घटनांमध्ये या दुर्घटनेची नोंद झाली आहे.

टायटॅनिकचे निर्माते

टायटॅनिकची निर्मिती करण्यामध्ये काही प्रमुख नावे घेतली जातात. लॉर्ड पिरी हे टायटॅनिकचे मुख्य डिझाइनर होते. ते हार्लंड ऍंड वुल्फ आणि व्हाईट स्टारचे संचालक होते. याच कंपनीमध्ये नौदल आर्किटेक्ट थॉमस अँड्र्यूज हे बांधकाम व्यवस्थापक आणि डिझाइन विभागाचे प्रमुख होते. शिपयार्डचे मुख्य डिझायनर आणि महाव्यवस्थापक ऍलेक्झांडर कार्लिसल यांचेही नाव आदराने घेतले जाते. जहाजामध्ये विलासी गोष्टी, आवश्यक उपकरणे, व्यवस्था आणि लाईफबोट ठेवण्याची जबाबदारी ऍलेक्झांडर कार्लिसल यांच्याकडेच होती. पण ६४ लाईफबोट ठेवण्याची योजना असताना यात केवळ २० लाईफबोट ठेवण्यात आल्या आणि या चुकीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला.

निर्मिती एका विशाल जहाजाची

या जहाजाची निर्मिती ३१ मार्च १९०९ रोजी अमेरिकन जे. पी. मॉर्गन आणि इंटरनॅशनल मर्कंटाइल मराइन कं. यांनी केली होती. ३१ मे १९११ मध्ये नौकापृष्ठ पाण्यात उतरवण्याला सुरुवात झाली व पुढच्या वर्षी प्रवास सुरु करायचा असा बेत आखण्यात आला.

टायटॅनिकची ८८२ फूट आणि ९ इंच लांब होती व ९२ फूट एवढी रुंदी होती, जहाजाचे वजन ४६,३२८ टन एवढे होते. पाण्याच्या पातळीपासून ५९ फूट उंची होती.

प्रवास टायटॅनिकचा…

१० एप्रिल १९१२ रोजी या जहाजाचा प्रवास सुरु झाला तेव्हा यावर ९०८ क्रू मेंबर्स होते आणि एकूण २२२३ प्रवासी यात्रा करत होते. व्हाईट लाईनच्या दोन वेगवेगळ्या जहाजात कोळश्याची कमतरता भासली म्हणून काही लोकांना या जहाजात हलवण्यात आलं होतं आणि इथेच त्यांचं दुर्दैव लिहिलं गेलं.

आता टायटॅनिकचा प्रवास सुरु झाला होता. जहाज हळूहळू आपल्या गंतव्याकडे वाटचाल करत होतं. आणि ४ दिवसांनंतर या जहाजाभोवती संकटाचे काळे ढग जमा झाले. ही भयावह घटना आहे १४ एप्रिलची. तेव्हा रात्रीचे ११ वाजून ४० मिनिटे झाली होती. त्या काळी पुष्कळ पैसे खर्च करुन सर्व सुख सुविधांनी सज्ज असलेलं हे जहाज आईसबर्गला जाऊन धडकले. यामुळे जहाजाच्या खालच्या बाजूला छिद्रे पडली आणि इतका वेळ आनंदाने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या मनात धडली भरली.

मृत्यूच्या जबड्यात टायटॅनिक

आता आपलं काय होईल? आपण पुन्हा जमीन पाहू शकतो की नाही की आपल्याला इथेच जलसमाधी घ्यावी लागणार आहे? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. हळूहळू पाणी जहाजात शिरायला लागलं. एकच पळापळ सुरु झाली. मृत्यू समोर भयाकाय जबडा उघडून उभा होता. बुडणार्‍या लोकांना वाचवण्यासाठी लाईफबोट सज्ज झाल्या. पण हाय रे दुर्दैव, ६४ लाईफबोट्सची योजना असताना जहाजावर केवळ २० लाईफबोट्स होत्या आणि २००० पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यासाठी ह्या लाईफबोट्स पुरेशा नव्हत्या.

फक्त आणि फक्त ७०० लोक कसेबसे वाचले. १५०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे केवळ ३३७ लोकांचं प्रेत सापडलं. बाकी प्रेतं विशाल समुद्राने गिळंकृत करुन टाकली. लहान मुलं आणि महिलांना प्राधान्य दिल्यामुळे सर्वात जास्त पुरुष मृत्यूमुखी पडले.

दुर्घटना का झाली?

टायटॅनिकच्या दुर्घटनेचा दोष अति-विलासिता आणि अति महत्वाकांक्षेला दिला जातो. अर्थात हे मानवी दोष आहेत. यात निसर्गाचा दोष कावळा बसायला नि फांदी तुटायला एवढाच आहे. इतिहासातील सर्वात मोठं जहाज बनवण्याची महत्वाकांक्षा होती. ही महत्वाकांक्षा १५०० पेक्षा अधिक लोकांचा जीव घेऊन शमली.

इतकं मोठं जहाज निर्माण केल्यानंतर, जहाजाचा वेग सुरुवातीस फार नसावा असं कुणालाच सुचलं नाही. असो, जर तर च्या बोलण्याला आता अर्थ उरला नाही. इतिहासातून शिकून पुढे त्या चुका करु नये एवढाच काय तो या घटनेतून अन्वयार्थ काढता येईल.

टायटॅनिकवर निर्माण झालेले चित्रपट

आपल्याला केवळ १९९७ रोजी प्रदर्शित झालेला ’यटॅनिक’हा चित्रपट लक्षात आहे. परंतु या घटनेवर अनेक चित्रपट व माहितीपट निर्माण झालेले आहेत. गंमत म्हणजे टायटॅनिक जहाजाच्या निर्मितीपेक्षाही जास्त पैसे टायटॅनिक या चित्रपटाच्या निर्मितीत खर्च झाले आहेत

या चित्रपटातील प्रेम कहाणी काल्पनिक असली तरी जहाज बुडण्याचा प्रसंग मात्र खरा आहे व जहाज बुडताना व्यवस्थापकांकडून संगीत वाजवल्याचं दृश्य दाखवण्यात आलं होतं, तेही खरं आहे. आजही हा चित्रपट पाहताना रोमांचक वाटतं. पण यापुढे चित्रपट पाहताना टायटॅनिकची ही खरी घटना मात्र नक्कीच तुमच्या डोळ्यांसमोर उभी राहिल. १९१२ रोजी बुडालेलं हे जहाज तब्बल ७३ वर्षांनी म्हणजे १९८५ ला सापडलं यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय!

टायटॅनिक जहाजात जीव गमावलेल्या सर्व प्रवाश्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.