एनसीबीचे ‘ऑपरेशन कॉर्डिलीया क्रूझ’… वाचा संपूर्ण कारवाईचा ‘थरार’

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे आणि त्यांचे अधिकारी यांनी 'ऑपरेशन कॉर्डिलीया क्रूझ' हे यशस्वी कसे केले ते जाणून घेऊया.

मुंबई टू गोवा टूरवर निघालेली कॉर्डिलीया क्रूझ मागील दोन दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. अनेकांना तर अशी क्रूझ आहे जी आपल्याला मुंबई ते गोवा सफर घडवून आणू शकते हे देखील माहीत नसावे. मात्र सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पकडले आणि या कारवाईची चर्चा देखील देशभरात रंगली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे आणि त्यांचे अधिकारी यांनी ‘ऑपरेशन कॉर्डिलीया क्रूझ’ हे यशस्वी कसे केले ते जाणून घेऊया.

एनसीबीने ड्रग माफियांचे कंबरडे मोडले

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आणि नंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अनेक ड्रग्स माफियांचे कंबरडे मोडले. वर्षभरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ३०० कोटींपेक्षा जास्त ड्रग्स जप्त करुन जवळपास ३०० जणांना अटक केली. मुंबईतील बड्या ड्रग्स माफियांपासून बॉलिवूडशी संबंधित लोकांचा यामध्ये समावेश होता.

(हेही वाचाः आर्यन खानच्या एनसीबीच्या कोठडीतील मुक्काम वाढला!)

कॉर्डिलियावरील पार्टीची लागली कुणकुण

ही पार्टी कोणी आयोजित केली आणि या पार्टीत कोण सहभागी होणार आहे, तसेच क्रूझवरील पार्टीत ड्रग्सचा वापर होणार आहे का नाही, याची माहिती एनसीबीच्या अधिका-यांनी काढली होती. या माहितीवरुन एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या पार्टीत आपले अधिकारी सामील करुन ड्रग्सचे सिंडिकेट उधळून लावण्याची योजना आखली.

‘ऑपरेशन कॉर्डिलीया क्रूझ’

एनसीबीचे ‘ते’ २२ अधिकारी

मुंबई बंदरातून शनिवारी दुपारी १ वाजता सुमारे दीड ते दोन हजार प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कॉर्डिलीया क्रूझवर दिल्लीतील एका बड्या कंपनीने पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी क्रूझवरील एक फ्लोर (मजला) बूक करण्यात आला होता. या पार्टीमध्ये सेलिब्रेटी येणार असल्यामुळे अनेकांनी या पार्टीचे बुकिंग केले होते. दरम्यान एनसीबीने देखील आपल्या २२ अधिका-यांना सामान्य प्रवासी बनून या क्रूझवर प्रवेश दिला होता. शनिवारी दुपारी १ वाजता कॉर्डिलीया क्रूझ मुंबई बंदरातून गोवाच्या दिशेने रवाना होणार होती, त्यापूर्वीच एनसीबीचे २२ अधिकारी क्रूझवर हजर होते व त्यांनी या पार्टीवर पाळत ठेवली.

(हेही वाचाः आर्यन खानला होणार 10 वर्षांची शिक्षा?)

ग्रीन गेटवरुन थेट कारवाई

दुसरीकडे स्वतः एनसीबीचे संचालक समीर वानखेडे एनसीबीची दुसरी टीम घेऊन इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनस ग्रीन गेट याठिकाणी क्रूझवरील सहकाऱ्यांच्या इशाऱ्याची वाट बघत थांबले होते. थोड्याच वेळात क्रूझ सुटणार असल्याची घोषणा कॅप्टनने केली. क्रूझवरील एनसीबीचे अधिकारी ज्या डेकवर पार्टी होणार होती त्यावर लक्ष ठेऊन होते. हळूहळू पार्टी रंगू लागली, या पार्टीत आर्यन खान देखील सामील झाला होता. क्रूझवर असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ग्रीन गेटवर असलेल्या अधिका-यांना इशारा करताच एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी क्रूझ सुटण्याच्या पाच मिनिटे अगोदर क्रूझचा ताबा मिळवत क्रूझवर सुरू असलेली रेव्ह पार्टी थांबवत आर्यन खान, मुनमुन धमाचा आणि अरबाज मर्चंटसह काही जणांना ताब्यात घेतले.

(हेही वाचाः कसे आले क्रूझवर ‘ड्रग्स’? जाणून घ्या संपूर्ण माहिती)

रात्री उशिरापर्यंत कारवाई

अचानक झालेल्या या कारवाईमुळे क्रूझवर काही वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र एनसीबीच्या अधिका-यांनी सर्व परिस्थिती हाताळून ताब्यात घेण्यात आलेल्यांना त्यांच्या सामानासह क्रूझवरुन उतरवत ग्रीन गेटवर आणले व क्रूझ सोडण्यात आली. मात्र एनसीबीने आपले काही अधिकारी क्रूझवर पाठवून ज्या ठिकाणी पार्टी होणार होती, त्या पार्टीतील ठिकाणे आणि पार्टीत सहभागी असणाऱ्यांचे जबाब नोंदवले. इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनस ग्रीन गेटवर आल्यानंतर एनसीबीने कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबई पोलिसांची मदत घेतली. एनसीबीनं ग्रीन गेटवरच ताब्यात घेण्यात आलेल्या आर्यन खानसह सर्वांची झडती घेऊन आठ जणांकडून अंमली पदार्थ आणि रोकड हस्तगत केली. ग्रीन गेटवरच सर्व पंचनामे करण्यात आले. ही कारवाई रात्री अकरा पर्यंत सुरू होती. त्यानंतर रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांना एनसीबी कार्यलयात आणण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here