संपूर्ण जगामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. भारत देशदेखील त्याला अपवाद नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसंबंधी सरकारतर्फे आणि पोलीस खात्यातर्फे विशेष उपाययोजना केल्या जातात आणि त्या अनुषंगाने विशेष उपक्रमदेखील राबविले जातात. परंतु या सर्व उपाययोजनांना अपेक्षित प्रसिद्धी दिली जात नाही. त्यामुळे सर्वसाधारण नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. काही सामाजिक संस्थादेखील अतिशय मोलाचे काम करीत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता संदर्भात महत्त्वाचे मुद्दे समजावून घेण्याच्या दृष्टीने काही वस्तुस्थिती सदृश्य घटना या ठिकाणी मांडू इच्छितो जेणेकरून ही माहिती सर्वसाधारण लोकांनादेखील वाचनीय होईल.
ज्योतिषी म्हणून घरात घुसखोरी केली
माझ्या ओळखीचे एक ज्येष्ठ नागरिक गृहस्थ वय अंदाजे ७५ वर्षे त्यांची पत्नी वय अंदाजे ७२ वर्षे असे दोघेच ठाणे येथील पाचपाखाडी परिसरात एका रो-हाऊसमध्ये राहतात. त्यांची मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत. एवढ्या मोठ्या घरामध्ये दोघेच ज्येष्ठ नागरिक राहतात. शेजारपाजाऱ्यांची त्यांच्या घरामध्ये ये-जा असल्याने घराचा दरवाजा फक्त रात्री बंद केला जातो. काही दिवसांपूर्वी एक ३५ वर्षीय इसम त्यांच्या घरामध्ये भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आला. त्याला त्यांनी बोलावलेदेखील नव्हते. त्याने बहुतेक त्यांच्या घरातील परिस्थितीची माहिती घेतली होती. त्यामुळे बोलता बोलता त्याने सांगितले, की घरामध्ये बाधा झाली आहे. त्यामुळे घरामध्ये कोणीतरी गंभीर आजारी असावे किंवा होणार आहे. त्या काळामध्ये त्यांची मेव्हणी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होती. त्यामुळे त्यांनी तत्काळ होकार दिला आणि मग त्या ज्योतिषाने त्याचा डाव टाकण्यास सुरुवात केली. बोलत बोलत तो घरातील देवघरापर्यंत गेला. तेथे उदबत्ती लावून थोडाफार मंत्रोच्चार केला. बोलण्यात त्या दोघांनाही भुलवले आणि घरातील बाधा घालवली असे सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली. आपण फसलो आहोत हे समजण्यासदेखील त्यांना बराच कालावधी गेला.
दागिने पर्समध्ये ठेवण्यास सांगितले आणि…
एक वयोवृद्ध स्त्री साकीनाका विभागातील एका शाळेजवळून दुपारच्या वेळी जात असताना दोन गृहस्थ तिला भेटले व त्यांनी सांगितले, की त्याच्या शेठला मुलगा झाला आहे. त्यामुळे गल्लीच्या टोकाला ते महिलांसाठी फुकट साडीवाटप करीत आहेत. त्याकरिता अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवा आणि पुढे जा. त्या महिलेला काही सुचले नाही. ते सांगतील त्याप्रमाणे त्या करत गेल्या. त्यांनी स्वतःहून अंगावरील दागिने काढून त्यांच्या समक्ष रुमालात ठेवले. त्यांनी तो रूमाल तिच्या पर्समध्ये ठेवला, परंतु त्यातले दागिने कधी काढून घेतले हे त्यांना कळले देखील नाही. पुढे काही अंतर चालत आल्यानंतर झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला व त्यांनी जमिनीवरच बसकण मारली.
आजकाल मोबाईल फोनवरून बरेच आर्थिक व्यवहार केले जातात. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांची मुले वा मुली परदेशात असल्याने त्यांचादेखील आग्रह असतो की, त्यांच्या आई-वडिलांनी नेट बँकिंग करावे. परंतु खूप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची यामध्ये फसगत झाल्याचे आढळून आलेले आहे. बँकेचा प्रतिनिधी म्हणून ठगी करणारे लोक त्यांना फोन करून त्यांची फसवणूक करून आवश्यक ती गोपनीय माहिती प्राप्त करून लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
अंधेरी येथील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सन २०१० मध्ये एका वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या त्यांच्या राहत्या घरामध्ये डोक्यात लोखंडी रॉड मारून केल्याचे आढळून आले. त्यांचे रक्त गॅलरीतील पाणी वाहून जाण्याच्या पाईपमधून खाली पडल्याने हा प्रकार लोकांच्या लक्षात आला. पुढे तपासामध्ये असे आढळून आले की, ही हत्या त्यांच्या मुलानेच केली होती. वरील सर्व घटनांमध्ये आपल्या लक्षात आले असेल की, बळी पडलेली व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहे. अशा प्रकारे मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात घडणाऱ्या घटनांमुळे साधारण जनतेमध्ये रोष निर्माण होऊन पोलिसांच्या क्षमतेबाबत शंका निर्माण होते. पोलिसांचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे गुन्ह्यास प्रतिबंध करणे म्हणजेच गुन्हा घडूच नये याकरिता सर्वतोपरी प्रयत्न व उपाययोजना करणे. त्याचप्रमाणे शासनाचीदेखील जबाबदारी आहे की, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहील या दृष्टीने योजना तयार करणे आणि त्या परिणामकारकपणे अमलात आणणे.
मुलगा-मुलगी सांभाळ करत नसेल, तर…
एखादा मुलगा अथवा मुलगी त्यांच्या आई-वडिलांची देखभाल करत नसल्यास ते याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार अर्ज करू शकतात. सदर तक्रार अर्ज ते स्वतः करू शकतात किंवा त्यांच्यातर्फे इतर व्यक्ती, स्वयंसेवी संघटनादेखील तक्रार अर्ज दाखल करू शकतात व रुपये १०,००० पर्यंत महिना खर्च भरपाई ते प्राप्त करू शकतात. सर्वसाधारणपणे आई-वडिलांची स्थावर अथवा जंगम मालमता प्राप्त होईपर्यंत मुले त्यांची देखभाल करतात. परंतु एकदा का मुलांच्या नावावर मालमत्ता नोंदणी झाली की, ती मुले आई-वडिलांची देखभाल करीत नाहीत. हे लक्षात घेऊन या कायद्यातील महत्त्वाची तरतूद (कलम २३) अशी आहे की, एखादा मुलगा अथवा मुलगी हा कायदा अमलात आल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांची देखभाल करीत नसेल आणि त्यापूर्वी त्याची मालमत्ता मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर नोंदणी झाली असेल तर ती नोंदणी रद्ददेखील होऊ शकते. त्याचप्रमाणे या कायद्यातील तरतुदीनुसार (कलम २५) जर मुलगा अथवा मुलगी ज्येष्ठ नागरिक असलेल्या आई-वडिलांची देखभाल करत नसेल किंवा त्यांना शारीरिक मानसिक त्रास देत असेल तर तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा किंवा रुपये ५००० दंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. या कायद्यांतर्गतचे गुन्हे दखलपात्र स्वरूपाचे असल्याने ज्येष्ठ नागरिक अथवा त्यांचे प्रतिनिधी याबाबत होणाऱ्या त्रासाविरुद्ध पोलिसातदेखील तक्रार देऊ शकतात. जुलै २०१८ मध्ये अशा प्रकारचा गुन्हा शिवाजी पार्क पोलीस ठाणे मुंबई येथे दाखल झालेला आहे. तसेच मा. उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये जर पाल्य आपल्या ज्येष्ठ पालकांची देखभाल करत नसतील तर अशा पाल्यांना घराबाहेर काढण्याचा अधिकारदेखील ज्येष्ठ पालकांना असल्याचा न्यायनिवाडा केलेला
आहे.
पोलिसही ज्येष्ठ नागरिकांची नोंद ठेवतात
पोलिसांतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी उपाययोजना केलेल्या आहेत. जे ज्येष्ठ नागरिक आपल्या घरामध्ये एकटेच राहत आहेत त्यांनी त्याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याला कळविले तर स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या घरी येऊन त्यांची प्राथमिक आणि आवश्यक माहिती गोळा करतात. अशा ज्येष्ठ नागरिकांच्या घरी बिट अधिकारी/अंमलदार नियमितपणे भेट देतात. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये साधारणपणे चार भाग केले जातात व त्या भागांना बिट असे संबोधले जाते. त्या प्रत्येक भागासाठी बिट अधिकारी नेमलेला असतो. तो बिट अधिकारी त्याच्या विभागातील ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करतो. त्यासंबंधी एक नोंदवही तयार केली जाते आणि त्यामध्ये संबंधित ज्येष्ठ नागरिकाची व त्याच्या जवळच्या नातेवाईकांची माहिती संकलित केली जाते. याशिवाय पोलिसांतर्फे हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती पोलिसांना कळविण्याबाबत लेखी सूचना दिल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबई पोलिसांनी विशेष टेलिफोन सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचे नंबर १०९०, २०३, १०० इत्यादी आहेत. याशिवाय जे ज्येष्ठ नागरिक सोशल मीडियाचा वापर करतात ते मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडलवर (@Mumbai Police) देखील संपर्क साधू शकतात.
(लेखक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस उपअधीक्षक आहेत.)