स्वातंत्र्याच्या इतिहासाविषयी केजरीवाल अज्ञानी!

मनीष सिसोदिया यांना क्लीनचिट देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही तुरुंगाला घाबरत नाही. तुम्ही सावरकरांची औलाद आहात, ज्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. आम्ही भगतसिंगांची औलाद आहोत, आम्ही भगतसिंगांना आमचे आदर्श मानतो, ज्यांनी इंग्रजांसमोर झुकण्यास नकार दिला आणि फाशी गेले. आम्ही तुरुंग आणि फाशीला घाबरत नाही, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला.

केजरीवाल यांनी आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करीत जो गैरसमज पसरवला आहे त्याकरता वीर सावरकर आणि भगतसिंग यांची भूमिका कशी एकच होती याचे दाखले इथे देत आहोत. तसेच सावरकर यांनी सुटकेसाठी ब्रिटीशांना आवेदनपत्रे देण्यामागे त्यांचा काय दृष्टिकोन होता आणि केवळ भगतसिंगच नव्हेतर देशातील शेकडो क्रांतिकारकांसाठी सावरकर प्रेरणास्रोत कसे बनले होते याचेही दाखले देत आहेत, त्यांचाही केजरीवालांनी अभ्यास करावा.

आपल्या कुठल्याही मागण्यांसाठी अर्ज किंवा याचिका दाखल करण्याचा अधिकार हा प्रत्येक कैद्याला असतो आणि त्या अर्जांनाच दयेचा अर्ज असं संबोधले जाते. मुळात दयेचा अर्ज करणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र फाशीची शिक्षा झालेले कैदी असा अर्ज करण्यास अपात्र होते. त्यामुळे फाशीची शिक्षा झालेल्या एकाही कैद्याने असे अर्ज केले नाहीत. सावरकर अंदमानात पोहोचले आणि त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल, सुविधा मिळण्याबद्दल आणि सर्वच क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी अनेक अर्ज केले. ही सर्व माहिती त्यांनी लपविलेली नाही तर स्वत:च ‘माझी जन्मठेप’ या आत्मवृत्तात लिहिली आहे. ५ ऑगस्ट १९१७ या अर्जाच्या शेवटी सावरकर लिहितात, ‘जर सरकारला हे सर्व मी माझ्या मुक्ततेसाठी लिहित आहे असे वाटत असेल किंवा सर्वांच्या सुटकेत माझे नाव असणे हाच मुख्य अडथळा असेल तर माझे नाव गाळावे. मला माझ्या सुटकेने जितके समाधान मिळेल तितकेच समाधान मला इतरांच्या सुटकेने मिळेल, अशा प्रकारे सावरकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुटकेसाठी प्राधान्याने ब्रिटिशांना आवेदन पत्रे लिहिली आहेत, हे खरेतर केजरीवालांसारख्या सावरकरद्वेष्ट्यांनी लक्षात घ्यायला हवे.

कुठल्याही प्रकारे ब्रिटिशांच्या तावडीतून सुटणे आणि पुन्हा लढा उभारणे हे प्रत्येक क्रांतिकारकाचे कर्तव्य आहे, हे सावरकरांचे मत होते. सावरकर आपले हे मत अंदमानात असलेल्या क्रांतिकारकांपुढे वारंवार मांडत. याला पुरावा म्हणजे थोर क्रांतिकारक सच्चिंद्रनाथ संन्याल यांचे कथन. लाहोर कटाच्या खटल्यात त्यांना जन्मठेपेची सजा झाली होती आणि सावरकरांप्रमाणेच वचनपत्र देऊन ते सुटले. नंतर त्यांनी पुन्हा जोमाने क्रांतिकार्य सुरू केले. त्यावेळी सावरकरांसोबत देशभरातील क्रांतिकारक जोडले गेले, त्यात उल्लासकर दत्त, भाई परमानंद, पृथ्वीसिंह आझाद, रामचरण शर्मा, विष्णू गणेश पिंगळे, रासबिहारी बोस, सच्चिंद्रनाथ संन्याल अशा अनेक क्रांतीकारकांचा समावेश होता. त्यामुळे केवळ भगतसिंग नव्हे तर देशातील शेकडो क्रांतीकारकांकरता सावरकर प्रेरणास्थानी होते, रास बिहारी बोस यांनी १९३९ मध्ये ‘दाई आजिया शुगी’ या जपानी मासिकात ‘सावरकर – नव्या भारताचा उगवता नेता – कर्तुत्व आणि व्यक्तिमत्व’ या शीर्षकाचे सावरकरांचे चरित्र लिहिले आहे. सावरकरांच्या सैन्य भरतीला रास बिहारी बोस यांचे समर्थन होते. त्यामुळे केजरीवाल यांनी कितीही गैर समज पसरवणारी वक्तव्ये केली तरी सावरकर आणि अन्य क्रांतीकारकांचे संबंध आणि त्यासंबंधी इतिहासातील नोंदी मिटल्या जाणार नाहीत.

आता सावरकर हे भगतसिंग यांच्यासाठी कसे आदर्श होते, यासंबंधीचा तपशीलही पाहू…

स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आपल्या संपूर्ण आयुष्याची समिधा अर्पित करणाऱ्या क्रांतिकारकांना एकमेकांच्या कार्याची जाण होती. एकमेकांविषयी प्रचंड आस्था होती. ‘विश्वप्रेम’ हा बलवंतसिंह या टोपणनावानं प्रसिध्द झालेला भगतसिंग यांचा लेख ‘मतवाला’च्या दोन अंकांमध्ये १५ नोव्हेंबर १९२४ आणि २२ नोव्हेंबर १९२४ छापला गेला होता. त्यात ते सावरकरांबद्दल लिहितात, “विश्वप्रेमी तो वीर आहे, ज्याला भीषण क्रांतिकारक, कट्टर अराज्यवादी म्हणायला आम्ही लोक जरादेखील लाजत नाही – तेच वीर सावरकर. विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन चालता चालता कोवळे गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना, म्हणून ते थांबत.”

लाहोरच्या द्वारकादास ग्रंथालयात वाचलेल्या सावरकरांच्या छोट्याशा इंग्रजी चरित्राचा भगतसिंग यांच्यावर कसा प्रभाव पडला होता. ज्यांना लाहोर कट प्रकरणात (१९२८-३१) आरोपी करण्यात आले होते त्या हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) च्या सर्व सदस्यांवर छापे मारताना पुस्तकांच्या प्रती सापडल्या होत्या, त्यात भगतसिंग यांचा समावेश होता. त्यामुळे हे स्पष्ट होते की भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी HSRA मध्ये नवीन भरती करणाऱ्यांकडून केवळ रशियन क्रांती आणि आयरिश रिपब्लिकन आर्मीबद्दलच नव्हे तर विनायक दामोदर सावरकरांची जीवनकथा देखील वाचण्याची अपेक्षा केली होती.

सावरकरांच्या ‘हिंदू पद पादशाही’ या पुस्तकातील सहा अवतरण भगतसिंगांनी त्यांच्या जेल डायरीत स्वतःच्या हस्ताक्षरात नोंदवली आहेत, ती पुढीलप्रमाणे आहेत, ती वाचून तरी सावरकर हे भगतसिंग यांच्यासाठी स्फूर्तीस्थान होते याचा केजरीवालांसारख्या सावरकरद्वेष्ट्यांना येईल.

 1. आत्मयज्ञही तेव्हाच पूज्य असतो की, जेव्हा प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असला तरी बुद्धीला पटेल अशा रीतीने तो यशाला आवश्यक असतो. जो आत्मयज्ञ अंतिम विजयाकडे घेऊन जात नाही त्याला मराठी युद्धपद्धतीच्या डावपेचात स्थळ नसे.
 2. “ह्या मराठ्यांशी युद्ध करावयाचे म्हणजे वाऱ्याशी भांडण्यासारखे आहे, पाणी दुभंग करण्यासारखे आहे!”
 3. आजच्या युगात इतिहास, घडविल्यावाचून लिहावा लागतो आणि तशी कृत्ये आयुष्यात प्रत्यक्ष करून दाखविण्यासाठी धाडसी कार्यक्षमतेवाचून आणि संधीवाचून पराक्रमी कृत्यांची काव्ये गावी लागतात!
 4. राजकीय पारतंत्र्याच्या शृंखला कधीकाळी झटकून टाकता येतात किंवा तोडून टाकता येतात; पण, सांस्कृतिक अंधश्रद्धेच्या शृंखला काढून टाकणे नेहमीच फार कठीण जाते.
 5. “Go, Freedom, whose smiles we shall never resign.
  Go, tell the invaders, the Danes, ‘That tis sweeter to bleed for an age at thy shrine
  Than to steep but a minute in chains
  – थॉमस मुर
 6. ‘‘मराठा तितुका मेळवावा । आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा।।
  येविषयी न करिता तकवा । पूर्वज हासती।।
  धर्मासाठी मरावे । मरोनि अवघ्यांसि मारावे
  मारिता मारिता घ्यावे । राज्य आपुले।।’’
  -रामदास

भगतसिंगांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा सूड म्हणून पृथ्वीसिंह आझाद आणि सुप्रसिद्ध महिला क्रांतिकारी दुर्गाभाभी व्होरा यांनी मुंबई मध्ये १९३० मध्ये लॅमिंग्टन पोलीस ठाण्यावर गोळीबार केला. यावेळी दुर्गाभाभी त्यांच्या लहान मुलाला बाबाराव सावरकरांच्या घरी सोडून आल्या होत्या. या कटात सावरकरांचे विश्वासू सहकारी आणि क्रांतिकारक गणेश रघुनाथ वैश्यंपायन सामील होते. ( हेच गणेश रघुनाथ वैश्यंपायन हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांचे देखील निकटचे सहकारी होते).

भगतसिंगांना फाशी झाल्यावर रत्नागिरीचे एक जहाल संघटनावादी वामनराव चव्हाण यांनी मुंबईला स्वीटलँड नावाच्या एका सैनिकी अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा १९३४च्या मे महिन्यात या घटनेबाबत सावरकरांना पुन्हा अटक झाली आणि दोन आठवडे त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. दि. २८ मे १९७२ या दिवशी प्रसिद्द झालेल्या साप्ताहिक प्रज्वलंतला दिलेल्या मुलाखतीमध्ये वामनराव चव्हाण यांनी सांगितले की १९२८ या वर्षी सरदार भगतसिंग स्वातंत्र्यवीरांच्या १८५७, चे भारतीय स्वातंत्र्य समर या सशस्त्र क्रांतिकारकांच्या गीतेची पुनरावृत्ती काढण्यासाठी अनुज्ञा घेण्यासाठी रत्नागिरीला आले होते. भगतसिंगांना क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांनीच ओळखपत्र दिले होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाप्रमाणेच ते रत्नागिरीत प्रथम माझ्या दुकानी आले. अशा लोकांची (गुप्त क्रांतीकारकांची) वीर सावरकरांशी भेट ही रात्री ९ वाजल्यानंतर होत असे. भगतसिंग रत्नागिरीत एकच दिवस होते. खरेतर केजरीवाल यांनी वीर सावरकर आणि भगतसिंग यांच्यात भेद करून स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल कमालीचे अज्ञानी असल्याचे सिद्ध केले आहे, अथवा राजकीय स्वार्थासाठी त्यांनी जाणीवपूर्वक वीर सावरकर यांचा अवमान करताना भगतसिंगांच्या वापर केला आहे.

(लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आहेत.)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here