आजोबांना व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज आला, अन् सगळे पैसे गेले? ऑनलाइन फसवणूक कशी टाळाल? 

जर कुणी डिजिटल अर्थव्यवस्थेचा वापर करणार असतील, तर त्यांनी त्याआधी कोणकोणती सावधानता बाळगण्याची गरज आहे, कुठे फसवणूक होण्याची शक्यता आहे, हे नीट समजून घेण्याची गरज आहे. 

134
डिजिटल अर्थव्यवस्था भारतात आता बऱ्यापैकी स्थिरावत चालली आहे, प्रत्यक्ष चलन न हाताळता लाखोंचे व्यवहार घरबसल्या करता येणे, हे या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य. मात्र यातून दिवसागणिक फसवणुकीचे नवनवीन प्रकार उघडकीस येत आहेत. विशेषतः यात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक अधिक प्रमाणात होते. त्यामुळे जर कुणी डिजिटल अर्थव्यवस्थेचा वापर करणार असतील, तर त्यांनी त्याआधी कोणकोणती सावधानता बाळगण्याची गरज आहे, कुठे फसवणूक होण्याची शक्यता आहे, हे नीट समजून घेण्याची गरज आहे.

अशी होते लाखोंची फसवणूक!

आम्ही हे तुम्हाला सांगतोय, त्यासाठी कारणही तसेच आहे. आतापर्यंत तुम्हाला अमुकतमुक बँकेतून बोलत आहे, तुमचे आधारकार्ड अपडेट करायचे आहे, म्हणून तुमचा आधार नंबर, पॅन नंबर, बँक खाते, एटीएम कार्ड नंबर, पिन नंबर मागितला जायचा आणि त्यानंतर क्षणात तुमच्या खात्यातील सगळीच्या सगळी रक्कम दुसऱ्या कुणाच्या तरी खात्यात वळती झाल्याचा एसएमएस तुम्हाला यायचा आणि तो फोन तुम्हाला तुमच्या बँकेतून नव्हे तर कुठल्यातरी भामट्याकडून आला होता, असे तुमच्या लक्षात येते, मात्र तोवर तुम्ही सगळे गमावलेले असते. मात्र आता एका ज्येष्ठ नागरिकाला नातलगाचा फोटो वापरून व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज पाठवण्यात आला आणि त्याआधारे लाखो रुपये बँकेत ट्रान्सफर करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमधून मॅसेज पाठवून पैसे मागितले!

असाच प्रकार अंधेरी परिसरात घडला. एका आजोबांनी नुकतेच ऑनलाईन बँकिंग सुविधा सुरु केली होती. आजोबा मोबाईलवरून विविध देयके भरत होते, कुणाला पैसे पाठवायचे असेल तरी ते मोबाईलवरून पाठवायचे. अशा प्रक्रारे एक दिवस आजोबांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचा फोटो असलेल्या नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज आला. उत्सुकतेपोटी आजोबांनी तो पाहिला. फोटो पाहून आजोबांनी लागलीच त्याला उत्तर दिले, खुशालीही विचारली आणि आजोबांचा तिथेच घात झाला. त्यानंतर आजोबांना त्याच नंबरवरून आणखी एक मॅसेज आला, ज्यात ‘आपल्या जवळच्या मित्राला ३ लाख रुपयांची गरज आहे. तो ते पैसे लगेच परत करणार आहे, तुम्ही पैसे पाठवाल का?’, असे म्हटले होते. आजोबांनी भाबड्या मनाने त्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून ते पैसे त्या व्यक्तीने सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर मात्र आजोबांनी पैसे मिळाले का, हे विचारण्यासाठी त्या नातेवाईकाकडे विचारणा केली आणि आजोबांना धक्काच बसला. कारण ते पैसे त्या नातेवाईकाने मागितलेच नव्हते, त्यामुळे ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहचलेच नाही. आपली फसवणूक झाल्याचे आजोबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी धावाधाव केली. ओशिवरा पोलिस ठाणे गाठले, तक्रार दिली, गुन्हा दाखल करून घेतला. पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र जर आजोबांनी पहिला व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज जो त्यांच्या नातेवाईकाचा फोटो असलेला आला होता, तो पाहून त्या नंबरची खातरजमा केली असती, तर पुढचा अ’न’र्थ टळला असता.

ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून कशी घ्याल खबरदारी? 

  • डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वाइप होताना प्रत्यक्ष तिथे हजर रहा, कार्ड तुम्ही केलेल्या व्यवहारापुरतेच स्वाइप होत आहे का, हे पहा.
  • कार्ड स्वाइप करताना कार्डचा पिन क्रमांक स्वतःच टाका. तो अन्य व्यक्तीला सांगू नका.
  • फोनवरून कुणी डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर, पिन कोड नंबर, सीव्हीव्ही कोड, एक्सपायरी डेट मागितली, तर ती सांगू नका.
  • ही माहिती विचारताना ऑफर किंवा बक्षिसाचे प्रलोभन दाखविले, तर त्याला बळी न पडता दुर्लक्ष करा.
  • मोबाइल वॉलेटसाठीचे कोणतेही अॅप्लिकेशन डाउनलोड करताना संरक्षित साइटवरून करा.
  • ऑनलाइन व्यवहारासाठी वापरात असलेला पासवर्ड साधारणपणे दर तीन महिन्यांनी बदला.
  • बँक खात्यासंदर्भातील गुप्त माहिती भरावी लागेल, असे कोणतेही व्यवहार सायबर कॅफे किंवा सार्वजनिक वायफाय वापरून करू नका.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.