Screen Time for Kids : सुट्टीत मुलांना स्क्रीनपासून दूर कसं ठेवाल?

185
Screen Time for Kids : सुट्टीत मुलांना स्क्रीनपासून दूर कसं ठेवाल?
Screen Time for Kids : सुट्टीत मुलांना स्क्रीनपासून दूर कसं ठेवाल?
ऋजुता लुकतुके

तसा भूतकाळात रमण्याचा आणि ‘आमच्या काळात असं नव्हतं,’ असं म्हणण्याचा माझा स्वभाव नाही. पण, लहान मुलांचा स्क्रीन टाईम हा विषय निघाला की, मला माझं बालपण आठवतंच. दर मे महिन्याच्या सुटीत मी परीक्षा संपली रे संपली की, माझ्या आजी-आजोबांकडे कोकणात सावंतवाडीला जायचे. १९९० च्या दशकात टीव्ही आणि त्यावर केबलच्या शंभर एक वाहिन्या आलेल्या होत्या. टीव्हीला सगळे ‘इडिअट बॉक्स’ म्हणायचे आणि तो कसा एकाचवेळी चांगला आणि वाईट आहे यावर आम्हा मुलांकडून निबंधही लिहून घेतले जायचे. (Screen Time for Kids)

पण, उन्हाळी सुटीत तीन महिने आम्ही अगदी स्वाभाविकपणे या स्क्रीनपासून दूर होतो. म्हणजे घरी टीव्ही असायचा. पण, आम्हा भावंडांना कधी या दिवसांत त्याची गरज पडली नाही. पहाटेपासून आमचे मुलांचे एकत्र कार्यक्रम सुरू व्हायचे. सकाळी सूर्योदयाला जवळच्या टेकडीवर छोटासा फेरफटका, त्यानंतर कामगार कल्याण मंडळात टेबल टेनिस आणि कॅरमचे ३-४ सामने यानंतरच आमचा नाश्ता व्हायचा. नाश्ता झाला की, घरच्या परसात धुमाकूळ आणि वेगवेगळे खेळ सुरू. दुपारी उन्हं असतात म्हणून तेव्हा पत्ते आणि इतर बैठे खेळ. संध्याकाळी पुन्हा उनाडकी, असा आमचा भरगच्च कार्यक्रम असायचा. यातच कधी सायकल शिकणं, पोहायला शिकणं, मोठं झाल्यावर स्कूटर शिकणं असे काही ना काही उपक्रम बरोबरच्या भावंडांबरोबरच असायचे. त्यासाठी कधी क्लास लावलेला आठवत नाही.

(हेही वाचा – Cricketer Kedar Jadhav : क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणाचे पीच आजमावणार ?; घेतली फडणवीसांची भेट)

उलट मुंबईत ९-१० महिने घालवल्यानंतर या कालावधीत टीव्ही बघण्याचं आमचं प्रमाण कमीच व्हायचं. हा, आठवड्याला एखादा सिनेमा नक्की असायचा. भावंडं आणि मित्र-मैत्रिणी यांचं एकत्र येणं, आजी-आजोबा आणि मामा, मामी, काका यांची मुलांमधील इन्व्हॉल्वमेंट, त्यांनी बरोबर घालवलेला वेळ आणि त्याचाच आनंद लुटण्याची वृत्ती यामुळे १९९०च्या दशकातील सगळ्याच मुलांचा सुटीचा वेळ असा आनंदात गेला असणार.

अलीकडे मात्र सुटी सुरू झाली की, मुलांचा एककलमी कार्यक्रम असतो टीव्ही, संगणक किंवा मोबाईलला डोळे चिकटवून काहीतरी पाहत बसणे नाहीतर गेम खेळणे. या व्यवधानांमुळे मुलं घराबाहेर फारशी पडत नाहीत. त्यामुळे मित्र नाहीत. आणि सुटी गावी घालवणं हे अनेक कारणांमुळे हल्ली जमत नाही किंवा जमवून आणलं जात नाही. अशावेळी मुलांना स्क्रीनपासून दूर कसं ठेवायचं या गोष्टीची चर्चा मी रिलेशनशिप कोच मैथिली सावंत, स्ट्रेंथ अँड कन्डिशनिंगचे मार्गदर्शक सौरभ जगताप आणि मुलांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करणाऱ्या लिला मिश्रा यांच्याशी चर्चा केली. त्या मंथनातून बाहेर आलेले काही मुद्दे सविस्तर बघूया…

स्क्रीन ही आधुनिक काळाची गरज आहे हे वास्तव स्वीकारा

हे खरं आहे. अलीकडच्या काळात मुलं शाळेच्या प्रोजेक्टसाठीही टॅब वापरतात. अनेकदा मुलांना शाळांनी टॅब दिलेला असतो. तेव्हा जास्त स्क्रीन-टाईम वाईट हे जरी खरं असलं तरी मुलं पूर्णपणे त्यापासून दूर राहू शकणार नाहीत, हे वास्तवही पालकांनी स्वीकारलं पाहिजे. तुमच्या काळी टीव्ही होता, आता संगणक, टॅब मोबाईल आहे.bसक्ती करण्याऐवजी मुलं कमीत कमी स्क्रीनसमोर राहतील असं लवचिक वेळापत्रक बनवा. जेवताना, जेवल्यानंतर किंवा आणखी ठरावीक वेळी स्क्रीन टाईम ठरवून द्या. ते नियोजन होतंय की नाही, यावर लक्ष द्या.

स्क्रीनटाईम सुरू होण्यापूर्वीच तो कधी थांबणार याची स्पष्ट कल्पना द्या

मुलं आणि पालकांमध्ये पारदर्शकता असणं आवश्यक आहे. मुलं ठरावीक कार्यक्रम बघत असतील तर तेवढा वेळ स्क्रीन बघण्याची किंवा गेम खेळताना ठरावीक वेळ तो खेळण्याबद्दल मुलांशी बोला. त्यांच्याकडून स्क्रीन टाईम कधी संपणार हे वदवून घ्या. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन तुम्ही टायमर सेट करू शकता. मोबाईलवर अलार्म सेट करू शकता. मुलांना आधीच कल्पना असेल तर ती नंतर नाराज होणार नाहीत.

दिवसाचा समतोल

मुलं दिवसभर सुटीत काय करणार हे ठरलेलं असेल आणि त्या दिनक्रमात तुमचाही सहभाग असेल तर मुलांना स्क्रीनची आठवणही येत नाही, अशी उदाहरणं आहेत. म्हणजे सुटीत मुलं त्यांचा दिवस कसा घालवणार आहेत, त्यांच्या आवडत्या कुठल्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत, काय नवीन शिकायचं आहे, कुठली शिबिरं आणि इतर ॲक्टिव्हिटी मुलांना आवडते हे पाहून त्यांना दिवस आखून दिला तर त्यांचाही वेळ मजेत जातो आणि पालकांनाही त्रास होत नाही. मुलांबरोबर पालकांनी चांगला वेळ घालवला तर मुलांना कंटाळा येणार नाही, त्या काळात स्क्रीनचं आकर्षण नक्कीच कमी होईल.

बोले तैसा चाले

ही उक्ती मुलांच्या बाबतीत चांगलीच लागू पडते. कारण, शेवटी मुलं घरातील मोठ्यांचं अनुकरणच करत असतात. तेव्हा तुम्ही तुमच्या स्क्रीनटाईमवर निर्बंध घातलेत तर मुलांना तुमचा मुद्दा पटवून द्याल. ईमेल, मेसेज, फेसबुक, इन्स्टाग्राम यासाठी आपले हातही दर काही मिनिटांनी फोनकडे वळतात. बिंजवॉचच्या नावाखाली आपणही एक भाग पाहायला सुरू करतो ते काही तास कार्यक्रम बघतच राहतो. उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसमोर हा मोह टाळला तरच मुलांसमोर आपण उदाहरण ठेवू शकू. (Screen Time for Kids)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.