बारावी बोर्डाचा शुक्रवारी गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरुन व्हायरल झाली होती. याबाबतची बातमी सर्व प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाली. परंतु, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आले नाही, यामुळे इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचेही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी साडेदहानंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात साडेदहा वाजेपर्यंत व दुपार सत्रात अडीच वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेले नाही, असे मंडळाच्यावतीने कळवण्यात आले आहे.
( हेही वाचा: मोठी बातमी! परीक्षेच्या अर्धा तास आधी बारावीचा पेपर फुटला )
परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही
पेपर फुटीप्रकरणात सिदंखेड राजा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community