HSC Paper Leak Case: बारावीचा फुटलेला पेपर घेणारे 119 विद्यार्थी सापडले

बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारावीचा गणिताचा पेपर अहमदनगरच्या महाविद्यालयातील 119 विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तासभर आधी मिळाल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या तपासातून समोर आली आहे. गणिताचा पेपर सोपवण्यात आलेल्या एचएससी बोर्डाच्या सदस्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात येत आहे.

बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रान्चने ही कारवाई केली आहे.

संस्थाचालकाची भूमिका संशयास्पद

मुंबई गुन्हे शाखेची एक टीम सध्या अहमदनगरमध्ये आहे. शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील काहींचा सहभाग असल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. तपासादरम्यान संस्थाचालकाची भूमिका संशयास्पद असल्याचे काही पुरावे क्राईम ब्रान्चच्या हाती लागले आहेत. संस्थाचालक सध्या बेपत्ता असून शोध सुरु आहे.

( हेही वाचा: हवा शुद्धीकरण तंत्रज्ञान कंपन्यांकडून ‘त्या’ समित्यांसमोर सादरीकरण )

‘त्या’ 119 विद्यार्थ्यांची चौकशी होणार

महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र इतर महाविद्यालयात आले अशा विद्यार्थ्यांचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. परंतु सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत आणि विद्यार्थी अल्पवयीन आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये, यासाठी परीक्षा संपल्यानंतर चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रान्चच्या अधिका-यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here