महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्न पत्रिकांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागली. या वाहनासोबत संपूर्ण प्रश्नपत्रिकाही या आगीन जळून खाक झाल्या आहेत. दहा दिवसांवर परीक्षा असल्याने या प्रश्नपत्रिका शिक्षण मंडळाला तातडीने पुन्हा छापाव्या लागणार आहेत. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटातून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका टेम्पोला आग लागून, त्यात टेम्पोसह आतील दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
(हेही वाचा – कोरोना काळातील महापालिका रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांची घोर उपेक्षा)
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला आग
मिळालेल्या माहितीनुसार, चार मार्चपासून सुरू होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची मध्य प्रदेशातील भोपाळ येथे छपाई करून, त्या पुणे येथील बोर्डाच्या कार्यालयात पोच करण्यासाठी टेम्पोमधून नेल्या जात होत्या. या वाहनात चालक मनोज चौरसियासोबत छपाई कंपनीचा व्यवस्थापक रामविलास रजपूत होते. पहाटे नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटातील हॉटेल साईप्रसादसमोर पाठीमागील बाजूने आग लागल्याचे लक्षात आले. चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून आग विझविण्याचे प्रयत्न केले.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
दरम्यान, या आगीत बारावीच्या प्रश्नपत्रिका असलेले 867 गठ्ठे जळून खार झाले असून परीक्षेबाबात गोपनीयता असल्याने अधिक सविस्तर तपशील नोंदविलेला नाही, असे घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. मात्र ही आग कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
Join Our WhatsApp Community