घोरपडीवर बलात्कार करणारा विकृत नराधम मोकाट

177
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथे शिकारीसाठी गेलेल्या तीन शिका-यांपैकी घोरपडीवर बलात्कार करणा-या विकृतासह अन्य दोन जणांना शुक्रवारी देवरुख न्यायालयाने जामीन मंजूर केला. या तिघांसह चौकशीत अटक केलेल्या चौथ्या आरोपीलाही देवरुख न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कायदेतज्ज्ञांच्या मतानुसार या खटल्यात आयपीसी ३७७ हा कलम सुरुवातीला लावताना दिरंगाई झाल्याने केस सशक्तपद्धतीने मांडता आलेली नाही. त्यामुळे वनविभागाच्या कायदेशीर सल्लेगारांकडून नेमका कोणता सल्ला दिला जात आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

न्यायालयाकडून चारही आरोपींचा जामीन मंजूर

चार आरोपींपैकी संदीप तुकाराम पवार (३७) असे घोरपडीवर बलात्कार करुन त्याचे मोबाईलमध्ये चित्रण करणा-या नराधमाचे नाव असल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली. संदीपसह मंगेश कामतेकर (३३), अक्षय कामतेकर या दोघांनाही वनविभागाने अटक करुन सुरुवातीला पाच दिवसांची वनकोठडी न्यायालयाकडून मिळवली. ही कोठडी संपताच एक दिवसाची कोठडी वाढवून मिळाल्यानंतर चौकशीदरम्यान रमेश घाग (५३) या आरोपीचाही ठावठिकाणा वनविभागाला लागला. शुक्रवारी सुनावणीदरम्यान त्यांना पंधरा दिवसांची न्यायलयीन कोठडी मिळाली होती. त्याचवेळी त्यांच्यावर वनविभागाकडून वनगुन्हयांतर्गत गंभीर कलमे लावली होती. मात्र त्याच दिवशी चारही आरोपींनी देवरुख न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. आरोपींवर वनाधिका-यांशी चर्चा केल्यानंतरच कडक निर्बंध घालण्यात आले. त्यानंतरच न्यायालयाने चारही आरोपींचा जामीन मंजूर केला.

आरोपांवरील निर्बंध 

० चौकशीसाठी वनविभागाच्या कार्यालयात वेळोवेळी हजर राहणे
० रत्नागिरी जिल्ह्याबाहेर जाण्यास बंदी
० सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या खासगी वनक्षेत्रात तसेच चांदोली वन्यजीव क्षेत्रात जाण्यास बंदी
० पुढील दोन महिने दर सोमवारी वनविभागाच्या कार्यालात हजेरी देणे

आरोपींवर न्यायालयाने लावलेली कलमे

वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार कलम ९, २७(१), ३१.३४(८),५१ आणि ५२

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कायदे कडक करा

प्राण्यांविरोधातील हिंसक कृत्यांना आळा घालण्यासाठी पेटा इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राण्यांवरील लैंगिक अत्याचाराला दखलपात्र गुन्हा म्हणून समाविष्ट करण्यासाठी द प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू एनिमल्स (पीसीए) कायदा १९६० मध्ये सुधारणा करण्याची विनंती केली आहे. पीसीए कायद्यांतर्गत कठोर शिक्षा केली जावी. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मुसार दोषींविरोधात सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि किमान दहा हजार रुपयांचा दंड आकारला जातो. मात्र आयपीसीच्या नियमानुसार एखाद्या प्राण्यावर लैंगिक अत्याचार करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा व दंड होऊ शकतो, असे आपत्तीकालीन प्रतिसाद टीम, पेटा इंडिया, वकिल तसेच प्राणीहक्क कार्यकर्ता, सहयोगी व्यवस्थापक
मीत आशार यांनी सांगितले.

वनविभागाची भूमिका

आम्ही कायदेशीर सल्ला घेऊनच खटला पुढे नेत आहोत. आरोपींची चौकशी सुरु राहील. आयपीसी ३७७ लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत
–  नानासाहेब लडकत, प्रकल्प संचालक  व वनसंरक्षक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.