साता-यात घोरपडीची शिकार

एप्रिल महिन्यात संगमेश्वर येथे शिका-याने घोरपडीवर केलेली बलात्काराची घटना ताजी असतानाच साता-यातही घोरपडीची खुलेआम शिकार झाल्याची घटना समोर आली आहे. साता-यातील कुमठे गावातील दोन मेंढपाळांना घोरपडीची शिकार करुन नेताना वनाधिका-यांनी सोमवारी रंगेहाथ पकडले. शेतात बक-या चरण्यासाठी गेले असताना त्यांनी घोरपडीची शिकार केली होती. घोरपडीला धनावडेवाडी येथील रस्त्यावरुन घेऊन जात असतानाच वनाधिका-यांनी त्यांना घोरपडीसह ताब्यात घेतले.

( हेही वाचा : रशियाने दिला ‘या’ देशाला पाण्यात बुडविण्याचा इशारा! )

घोरपडीच्या शिकारीच्या प्रकरणाचा तपास केला जाईल

भिमराव बनसोडे आणि अमर तरडे या दोन मेंढपाळांना वनाधि-यांनी पकडून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले. त्यांनी कुमठे गावात ऊसाच्या शेतात घोरपडीची कु-हाडीने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली. मांस खाण्याच्या हेतूने ही शिकार केल्याची माहिती त्यांनी वनविभागाला दिली. मात्र गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सातारा वनविभागाने शहर भागांत सुरु केलेल्या धडकसत्रात घोरपडीच्या लिंगापासून बनवलेले हत्ताजोडीची अवैध विक्री प्रकरण समोर आणले होते. या प्रकरणात स्थानिकांचाही सहभाग असल्याचा वनविभागाला संशय आहे. त्या अनुषंगानेच कुमठे गावातील घोरपडीच्या शिकारीच्या प्रकरणाचा तपास केला जाईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.

घोरपड ही वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार पहिल्या वर्गवारीत संरक्षित असल्याने तिची शिकार वन गुन्हा ठरते. त्यानुसार दोन्ही आरोपी मेंढपाळांना घोरपडीची शिकार करणे, मांस अनधिकृतपणे बाळगणे, वाहतूक करणे या आरोपांखाली न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी दिली आहे.

कारवाई पथक 

ही कारवाई सातारा प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांच्या अवनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, वनपाल अरुण सोळंकी, वनपाल कुशल पावरा, वनरक्षक महेश सोनावले, वनरक्षक सुहास भोसले, वनरक्षक सुहास मोसलगी, वनरक्षक साधना राठोड, वनरक्षक अश्विनी नरळे, वनरक्षक मारुती माने यांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here