ब्रह्रपुरीतील चिमूर या बफर क्षेत्रातील जंगलात तेंदूची पाने गोळा करायला गेलेल्या पती पत्नीवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पतीचा रात्री उशिरापर्यंत वनाधिका-यांकडून शोध सुरु होता.
( हेही वाचा : मालवण बोट दुर्घटना : शिवसेना आमदाराच्या पुतण्याचा मृत्यू)
चिमूर तालुक्यातील केवाडा येथील विकास आणि मीना जाभूळकर हे दोघे पती-पत्नी सकाळी केवाडा-गोदेडा वनपरिसरात तेंदूची पाने गोळा करण्याकरता गेले असता वाघाचा हल्ला झाला. मीना जाभूळकर यांचा मृतदेह सायंकाळी सापडला. मात्र विकास बेपत्ता असल्याने वनाधिकारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते. मात्र त्यांची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. वाघाच्या वास्तव्याच्या ठिकाणी तेंदूची पाने गोळा करताना सावधानता बाळगा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
तेंदूपत्ता गोळा करताना ही काळजी घ्यावी
- सकाळी आणि सायंकाळी जंगलात वाघाचा भ्रमण असताना तेंदूची पाने गोळा करायला जाऊ नका.
- तेंदूची पाने गोळा करताना समूहाने जंगलात जा.
- तेंदूची पाने गोळा करताना काही कामगारांनी जंगलात समूहाजवळ पहारा देणे आवश्यक आहे.
- जमिनीवर वाकून तेंदूची पाने गोळा करणा-याला भक्ष्य समजून वाघ हल्ला करतो. त्याचा वावर आहे की नाही, याची खातरजमाही वनविभागाकडून करावी.