आहेत दोन बायका, नव-याचे कारनामे ऐका

आता स्त्रीहट्ट पुरवण्याशिवाय पुरुषांना दुसरा काही ऑप्शनच नसतो. त्यात जर दोन बायका असतील तर मग काय डबल धमाका.

दोन बायका फजिती ऐका… या अशोक मामांच्या सिनेमाने चांगलीच धम्माल उडवली होती. दोन बायकांच्या तालावर नाचताना नव-याला कशी तारेवरची कसरत करावी लागते, त्याचे अनेक किस्से आपण पाहिले किंवा ऐकले आहेत. आता स्त्रीहट्ट पुरवण्याशिवाय पुरुषांना दुसरा काही ऑप्शनच नसतो. त्यात जर दोन बायका असतील तर मग काय डबल धमाका. म्हणूनच हे हट्ट पुरवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या कराव्या लागतात. अशीच एक शक्कल दोन बेगमचा शौहर(पती) असलेल्या नाविदने लढवली आहे.

दोन बायका संभाळण्यासाठी त्याने थेट घरातच बनावट नोटांचा छापखाना सुरू केला. मात्र त्याचे हे प्रयत्न असफल झाले आणि तो नोटांच्या पहिल्या डिलेव्हरीतच पोलिसांच्या हाती लागला. कुर्ला पोलिसांनी बनावट नोटांसह अटक करण्यात आलेल्या नाविद अहमद उबेद शेख याने पोलिसांना तशी कबुली दिली आहे.

(हेही वाचाः धक्कादायक! आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हे!)

आला कोरोना, त्याचे काही चालेना

नाविदचे दोन विवाह झाले आहेत. त्याची एक पत्नी भिवंडी तर दुसरी मुंब्रा येथे राहते. दोन्ही पत्नींवर नाविदचे जीवापाड प्रेम आहे. तो आपल्या दोन्ही पत्नींचे सगळे हट्ट पुरवायचा. पण नंतर आला कोरोना, मग या गड्याचे काही चालेना. दोघींना एकसारखाच जीव लावणारा नाविद लॉकडाऊनच्या काळात कामधंदा नसल्यामुळे बेरोजगार झाला. आता कोरोना हा रोगच असा आहे, की त्यापुढे नाविदच्या प्रेमरोगाचाही निभाव लागला नाही. म्हणून मग त्याने एक शक्कल लढवली आणि मुंब्रा येथील आपल्या राहत्या घरात त्याने बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला.

त्याने छापल्या, पोलिसांनी पकडल्या

संगणक, स्कॅनर, प्रिंटर, कटर मशीन आणि नोटांसारखे दिसणारे पेपर इत्यादी त्याने मुंब्रा येथील घरी आणून ठेवले होते. पाचशे रुपयांची एक नोट प्रथम स्कॅन करुन त्याची कलर प्रिंट काढून त्याने ती बाजारात खपवली. कुणाला काही संशय न आल्यामुळे त्याने थोड्या-थोड्या करुन पाचशे रुपयांच्या भारतीय चलनातील नोटांची मोठ्या प्रमाणावर छपाई सुरू केली. त्यासाठी त्याने ग्राहकही मिळवण्यास सुरुवात केली होती. या नोटा अर्ध्या किंमतीत विकण्यासाठी त्याने योजना आखली होती. या नोटांची पहिली डिलिव्हरी देण्यासाठी तो कुर्ला पश्चिम बेलग्रामी रोड येथील एका हॉटेल जवळ येणार असल्याची माहिती कुर्ला पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शशांक शेळके यांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्यावेळी त्याच्या बॅगमध्ये पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे एक बंडल सापडले.

(हेही वाचाः वडिलांची युक्ती आली कामाला! ‘असा’ लागला मतिमंद मुलाचा शोध!)

लाखो रुपयांच्या बनावट नोटा

या प्रकरणी पोलिसांनी नाविदला बनावट नोटांसह अटक केली. दरम्यान त्याच्या मुंब्रा येथील घरी छापा टाकून संगणक, प्रिंटर, कटर मशीन इत्यादी वस्तू आणि सुमारे ५०० रुपयांच्या ४१३ बनावट नोटा अशा एकूण २ लाख ८० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशांक शेळके यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून त्याचे इतर सहकारी यामध्ये असण्याची शक्यता असून, त्याची माहिती काढली जात असल्याचे शेळके यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here