Hyderabad liberation day 2022: सरदार वल्लभभाई पटेल यांनी राबवलेलं Polo Operation आहे तरी काय?

124

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला, पण हैदराबाद मात्र निजामांच्या गुलामीत होतं. हैदराबाद स्वतंत्र राहिल, अशी घोषणा करणा-या निजाम मिर उस्मान अलीने पाकिस्तानसोबत संधान बांधले होते. निजामाच्या रझाकारांनी नागरिकांवर अनन्वित अत्याचार सुरु केले होते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादवर पोलीस कारवाई केली. Operation Polo च्या माध्यमातून केवळ 108 तासांमध्ये त्यांनी निजामाला गुडघ्यावर आणले आणि हैदराबाद मुक्त केले. त्याचे स्मरण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन म्हणून  पाळला जातो.

सरदार पटेल यांना धमकी….

भारत स्वातंत्र्य झाल्यावर इतर संस्थांनाप्रमाणे हैदराबाद भारतात विलिन व्हावे, असे आवाहन भारत सरकारने केले होते. पण निजाम मात्र याच्या विरोधात होता. भारताने त्यासाठी चर्चेची भूमिका घेतली. नोव्हेंबर 1947 ला सरदार वल्लभभाई पटेल आणि कासिम रिझवीची दिल्लीत भेट झाली. हैदराबादला जर हात लावाल तर महागात पडेल अशी थेट धमकीच त्याने सरदार पटेल यांना दिली. त्यावर तुम्ही जर आत्महत्याच करायचे ठरवले असेल तर आम्ही कसे काय थांबवणार असे प्रत्युत्तर पटेल यांनी दिले.

…म्हणून या ऑपरेशनला नाव पोलो असे नावे देण्यात आले

हैदराबादमध्ये लष्करी कारवाई करण्यासाठी सरदार पटेल यांनी हालचाली सुरु केल्या. पण या कारवाईला लष्करी कारवाई असे न म्हणता पोलीस कारवाई असे नाव देण्यात आले. कारण लष्करी कारवाई परकीय राष्ट्राच्या विरोधात केली जाते. हैदराबाद तर भारताचाच भाग आहे, त्यामुळे पोलीस कारवाई करण्याचे ठरले. यामुळे पाकिस्तानसह इतर देशांची तोंडेही बंद होणार होती.

हैदराबादमध्ये त्यावेळी जगातील सर्वाधिक म्हणजे 17 पोलो ग्राऊंड होते. त्यामुळे या कारवाईला ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आले. 13 सप्टेंबर रोजी भारतीय लष्कर हैदराबादमध्ये घुसले. त्यावेळी गोरखा बटालियनने जबरदस्त आक्रमण केले. रझाकारांचे सैन्य जेमतेम 24 हजारांच्या आसपास होते. अवघ्या तीनच दिवसांत हैदराबादमधील सर्व प्रमुख ठिकाणे भारताच्या ताब्यात आली. भारतीय सैन्याच्या आक्रमणापुढे रझाकार तग धरु शकले नाहीत. 17 सप्टेंबर रोजी म्हणजे पाच दिवसांनी निजामाने शरणागती पत्करली.

( हेही वाचा: विनायक राऊतांच्या वाटेत आव्हानांची पेरणी, विश्वासू शिलेदार फोडण्यात शिंदे गटाला यश )

भारतीय लष्कराने 108 तासांमध्ये निजामाला गुडघ्यावर आणले. या कारवाईत भारताचे 66 जवान हुतात्मा झाले तर 1 हजार 373 रझाकार मारले गेले. निजाम शरण आला, तर कासिम रिझवीला अटक करण्यात आली आणि नंतर त्याला पाकिस्तानमध्ये सोडण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करुन ख-या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.