राज्यात पारंपारिक व अपारंपरिक उर्जास्रोतापासून वीज निर्मिती सुरू असतानाच भविष्यात हायड्रोजनपासून वीज निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुणे येथे आयोजित पर्यायी इंधन परिषदेत केली.
अपारंपारिक ऊर्जेला प्रोत्साहन देणार
राज्यभर इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंगसाठी अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी ऊर्जा विभागाने तयारी केलेली आहे. अपारंपरिक उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार लवकरच अपारंपरिक ऊर्जा धोरण 2020 मध्ये सुधारणा करून अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना अधिक प्रोत्साहन देईल, असे संकेतही राऊत यांनी यावेळी दिले.
लवकरच हायड्रोजन ऊर्जेवर वीज निर्मिती
‘पारंपारिक इंधनापासून वीज निर्मितीवर आम्ही आजवर केंद्रित होतो. आता आम्ही हायड्रोजन ऊर्जेवर लक्ष केंद्रित करीत आहोत. लवकरच, हायड्रोजनपासून वीज निर्मितीचा प्रयोग राज्यात सर्वप्रथम होईल,’ अशी घोषणा डॉ. राऊत यांनी मंगळवारी पुणे येथे अल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्हला संबोधित करताना केली.
( हेही वाचा: ‘राज ठाकरे’ झाले आजोबा! अमित ठाकरेंना पुत्ररत्न )
चार्जिंग स्टेशन्स उभारणार
वाहतूक क्षेत्रातील हरित ऊर्जेचा वाढता वापर सुलभ करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीने पेट्रोल पंपाच्या आवारात चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी पेट्रोल कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community