राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, अकोट तालुक्यातील कुटासा मतदार संघातून प्रहार पक्षाचे उमेदवार स्फूर्ती निखिल गावंडे यांनी विजय मिळवला आहे. तर अमोल मिटकरी यांच्या गावातच त्यांच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. आता यावरून जोरदार राजकारण रंगले असून, मिटकरी विरुद्ध बच्चू कडू असा वाद रंगला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजपच्या आमिषाला बळी पडल्याचा आरोप केला. त्यावर आमिष घेतल्याचे सिद्ध करा, राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, चुलीत गेले मंत्रिपद, अशा शब्दांत बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला.
मी आमिषाला बळी पडणारी औलाद नाही
अमोल मिटकरी हा मोठा माणूस आहे. मी आमिषाला बळी पडणारी औलाद नाही. दबावाला बळी पडणारा मी नाही. तिथे भाजपचा उमेदवार होता, त्यांनी मला समर्थन कसे दिले ते मला माहिती नाही. त्यामुळे आमिष दाखवणे, त्याला बळी पडणे ही बच्चू कडूची औलाद नाही. मिटकरी यांनी आरोप सिद्ध करावे, मी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू हे मोठे नेते आहेत, मी फक्त हेच म्हणतोय, बच्चू भाऊंसारखा नेता दिव्यांगाचं नेतृत्त्व करतात, भाजपसोबत ते कसं जाऊ शकतात, हा माझा प्रश्न आहे, असं मिटकरी म्हणाले.
(हेही वाचा : एनसीबीची क्रूझवरील छापेमारी बनावट! भाजपाचा उपाध्यक्ष होता कारवाई पथकात!)
अमोल मिटकरी काय म्हणाले?
प्रहार या पक्षाला कुटासा या माझ्या गावात बच्चू भाऊंच्या पक्षाला फक्त ७८ मते आहेत, आमच्या उमेदवाराला ९५३ मते आहेत. याचा अर्थ असा आहे, कामे केली नसती तर मते मिळाली नसती. पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला. भाजपची मते प्रहारने खेचली. अकोल्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादीची कामगिरी चांगली आहे. माझ्या सर्कलमध्ये पराभव झाला असला तरी ग्रामीण भागात फार मोठं यश मिळालं. बच्चू कडूंनी भाजपसोबत छुपी युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसल्याचे मिटकरी म्हणाले. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजप १, शिवसेना १, राष्ट्रवादी २, काँग्रेस १ आणि इतर ९ (यामध्ये प्रहार १) जागा मिळाल्या.
Join Our WhatsApp Community