मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारु! – पोलीस आयुक्त नगराळे

मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याचा सहभाग अंबानी प्रकरणात आला आहे ते योग्य नाही, एटीएस, एनआयए या तपास यंत्रणा त्यावर काम करीत असून जो दोषी असेल, त्याला शिक्षा होईल, असे मुंबई पोलीस आयुक्त नगराळे म्हणाले.

सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदी बसवण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी नगराळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कारभार हाती घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी साधलेल्या सवांदात गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारू व पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचे नाव देशात चांगले करु, असे त्यांनी यावेळी म्हटले.

१९८७च्या आईपीएस बॅचचे असलेले हेमंत नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकांचा  कार्यभार होता. पोलीस आयुक्त परमबीर सिंग याची बदली करण्यात आल्यानंतर हेमंत नगराळे यांच्या नावाची घोषणा मुंबई पोलीस आयुक्तपदी करण्यात आली. त्यानंतर बुधावरी सायंकाळी हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. नगराळे यांनी मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस, आयुक्त (गुन्हे), अप्प्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून प्रशासन म्हणून काम केले आहे.

(हेही वाचा : सचिन वाझेंचा पॉलिटिकल बॉस कोण, तो शोधायला हवा! देवेंद्र फडणवीस)

मुंबई पोलीस दल खूप कठीण समस्येतून जातेय!

मागील काही दिवसांपासून मुंबई पोलीस दल खूप कठीण समस्येतून जात आहे, ती समस्या सर्वांच्या मदतीने तसेच पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्याच्या मदतीने सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल, असे मुंबईचे नवनियुक्त मुंबई पोलीस नगराळे आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मागील दिवसात जो काही प्रकार समोर आला आहे, ज्या प्रकारे मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याचा सहभाग या प्रकरणात आला आहे ते योग्य नाही, एटीएस, एनआयए या तपास यंत्रणा त्यावर काम करीत असून जो दोषी असेल, त्याला शिक्षा होईल, असेही नगराळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

सचिन वाझे विषयावर अधिक भाष्य नको!

मुंबई पोलीस मागील काही दिवसात नाजूक परिस्थितीतून जात आहे. पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. ती सुधारण्याची जबाबदारी माझी असेल आणि ती सुधारायची आहे, यासाठी मला माझे सहकारी, मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि अमलदार यांच्या सहकार्याची गरज लागेल, असे मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त नगराळे यांनी म्हटले. सचिन वाझे, सीआययू पथकाबाबत सध्या भाष्य करणे योग्य नाही, असे सांगून नगराळे यांनी त्यावर बोलण्यास टाळले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here