विरारमध्ये माजी व्यवस्थापकानेच केला बँक लुटण्याचा प्रयत्न! एका महिलेची हत्या

विरार पूर्वेकडील राष्ट्रीयकृत बँक आयसीआयसीआयच्या माजी व्यवस्थापकाने शस्त्राचा धाक दाखवून बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. बँक लुटण्यासाठी आलेल्या माजी व्यवस्थापकाला विरोध करणाऱ्या बँक व्यवस्थापक योगिता वर्तक यांची हत्या करण्यात आली असून, कॅशियर श्वेता देवरुखकर या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.

अशी घडली घटना

या घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विरार पूर्वेला मनवेल पाडा याठिकाणी आयसीआयसीआय बँकेची शाखा आहे. गुरुवारी सायंकाळी बँक बंद झाल्यावर बँकेत बँक व्यवस्थापक योगिता वर्तक आणि कॅशियर श्वेता देवरुखकर या दोघी जणी होत्या. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास याच बँकेचा माजी व्यवस्थापक असलेला अनिल दुबे बँकेत आला व त्याने कमरेत खोसलेला चाकू बाहेर काढून, पैसे आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.

महिला व्यवस्थापकाची हत्या

यावेळी योगिता आणि श्वेता यांनी त्याला विरोध करताच, दुबेने बँक व्यवस्थापक योगिता वर्तक आणि श्वेता देवरुखकर यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात योगिता यांचा जागीच मृत्यू झाला असून, श्वेता ही गंभीररित्या जखमी झाली आहे. बँकेत सुरू असलेला आरडाओरडा ऐकून बाहेर नागरिकांनी गर्दी केली आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या अनिल दुबेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here