उघडे मॅनहोल्स झाकण्यासाठी मुंबई महापालिका करत असलेल्या कामाचे कौतुक आहे. मात्र, काम पूर्ण होईपर्यंत उघड्या मॅनहोल्समुळे काही अनुचित प्रकार घडल्यास महापालिका जबाबदार राहील, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले.
शहरातील उघड्या मॅनहोल्सबाबत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी चिंता व्यक्त करत पालिकेला या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे निर्देश दिले. राज्यभरातील सर्व मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे व उघडे मॅनहोल्सबाबत उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. उघडे मॅनहोल्स झाकण्यासाठी मुंबई पालिका युद्धपातळीवर काम करत आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी दिली. तुम्ही काम करत आहात, हे चांगले आहे. पण तोपर्यंत काही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही पालिकेला जबाबदार धरणार. उघड्या मॅनहोल्समध्ये एखादी व्यक्ती पडली तर काय? असे न्यायालयाने म्हटले.
( हेही वाचा: मालकी हक्काच्या घरांसाठी सफाई कामगार धडकणार आमदारांच्या घरी )
आधुनिक तंत्रज्ञान वापरा
- उच्च न्यायालयाने महापालिकेला आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली. ज्यावेळी मॅनहोल्सवरील झाकण काढले जाईल. त्याच क्षणी संबंधित अधिकारी सतर्क होतील, अशी काही तरी सोय करा.
- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या आधुनिक काळात आपण अन्य कोणताही वेगळा विचार करु शकत नाही.
- मॅनहोल्सच्या झाकणाला हात लावल्यावर तत्काळ समजेल, असे काही डिव्हाइस का बनवू शकत नाही? झाकणाला का बनवू शकत नाही? झाकणाला हात लावल्यावर बिप तुमच्या कार्यालयात ऐकायला येईल.
- तुम्ही सेन्साॅरप्रमाणे काहीतरी बनवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने पालिकेला केली. याचिकेवरील पुढील सुनावणी 9 डिसेंबरला आहे.