बाबाराव सावरकरांचे ‘ते’ म्हणणे गांधींनी ऐकले असते, तर भगतसिंह-राजगुरू फासावर गेले नसते!

आज 16 मार्च, म्हणजेच क्रांतिवीर बाबाराव सावरकरांचा स्मृतीदिन. त्यानिमित्तानेच बाबारावांनी क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख...

197

गुलामगिरीच्या बेड्यांनी जखडलेल्या आपल्या भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी सावरकर कुटुंबीयांनी आपल्या घरादाराचा होम केला. तिन्ही सावरकर बंधूंनी मातृभूच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठे योगदान दिले. यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश(बाबाराव) सावरकरांनी केलेले कार्य, हे कधीही न विसरता येण्यासारखे आहे.

भगतसिंह, राजगुरूंसारख्या असंख्य क्रांतिकारकांना फाशी होऊ नये, म्हणून बाबारावांनी केलेल्या मागणीचा जर गांधींनी गांभीर्याने विचार केला असता, तर आजचा इतिहास वेगळा असता. आज 16 मार्च, म्हणजेच क्रांतिवीर बाबाराव सावरकरांचा स्मृतीदिन. त्यानिमित्तानेच बाबारावांनी क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख…

बाबाराव होते राजगुरूंचे क्रांतिकार्यातील ‘गुरू’

पारतंत्र्याच्या अंधकारातून वाटचाल करणा-या तरुण देशभक्तांसाठी बाबारावांनी क्रांतीची ज्योत प्रज्वलित करत, त्यांना स्वातंत्र्याचा सुवर्ण मार्ग दाखवला. बाबारावांच्या प्रेरणेने पेटून उठलेल्या असंख्य तरुणांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. क्रांतिकारकांच्या या धगधगत्या अग्नीकुंडातील एक तळपती समिधा म्हणजेच थोर क्रांतिकारक राजगुरू. राजगुरूंचे सशस्त्र क्रांतिकार्यातील पहिले गुरू होते बाबाराव सावरकर. बाबारावांनीच राजगुरूंना राष्ट्रकार्याचा ‘गुरूमंत्र’ दिला.

बाबारावांच्या वज्रनिश्चयी देशभक्तीचा होता प्रभाव

बाबाराव सावरकर 1926 साली जेव्हा मुंबईतील खार येथे वास्तव्यास होते, तेव्हा राजगुरू त्यांना पुण्याहून भेटायला येत. तेव्हा या दोघांमध्ये राष्ट्रकार्याबाबत भरपूर चर्चा व्हायची. बाबारावांचे थोर क्रांतिकार्य, मातृभूच्या स्वातंत्र्यासाठी कुठल्याही हालअपेष्टा सहन करण्याचा त्यांचा निर्धार, अंदमानच्या कराल कारागृहात यातना भोगत असताना सुद्धा, पारतंत्र्याच्या बेड्या तोडून टाकण्याचा बाबारावांचा वज्रनिश्चय, ही सारी एका महान योद्ध्याची लक्षणे आहेत. याचमुळे राजगुरूंवर बाबारावांचा मोठा प्रभाव होता.

…आणि भारताला ‘क्रांतीरत्ने’ मिळाली

बाबारावांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरू क्रांतीच्या खडतर पण सुखकर मार्गावर मार्गक्रमण करत होते. याच दरम्यान बाबारावांनी राजगुरुंची ओळख द हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीच्या भगतसिंह यांच्याशी करुन दिली. भगतसिंह यांची लाहोर येथील ही संघटना क्रांतिकार्याला पोषक होती. राजगुरू क्रांतीची योजना आखण्यासाठी पंजाबलाही गेले होते. नंतर नागपुरात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत काम केले. अशाप्रकारे राजगुरू आणि भगतसिंह यांच्या रुपाने भारताला दोन क्रांतीरत्ने मिळाली.

लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला

इंग्रजांनी लागू केलेल्या सायमन कमिशनच्या निषेधार्थ लाला लजपत राय यांच्या मार्गदर्शनात लाहोरमध्ये निदर्शने झाली. त्यावेळी ब्रिटिश अधिकारी सॉंडर्सने आंदोलनका-यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. यामध्ये लाला लजपत राय गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळी संतप्त झालेल्या क्रांतिकारकांनी साँडर्सला धडा शिकवून लालाजींच्या हत्येचा बदला घ्यायचे ठरवले.

फाशीची शिक्षा

17 सप्टेंबर 1928 रोजी दुपारी 4 वाजता भगतसिंग आणि राजगुरू यांनी साँडर्सवर गोळ्या झाडत त्याचा वध केला. यानंतर राजगुरू पुण्याला परतले. मात्र लवकरच त्यांना पोलिसांनी पकडले. या खटल्यात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना विशेष न्यायाधिकरणाने ७ ऑक्टोबर १९३० रोजी फाशीची शिक्षा सुनावली.

बाबारावांनी घेतली गांधींची भेट 

यामुळे बाबाराव सावरकर व्यथित झाले. भगतसिंह आणि राजगुरू यांची फाशी रोखण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवले. गांधींच्या विचारांचा कायमंच विरोध करणा-या बाबारावांनी, केवळ क्रांतिकारकांच्या हितासाठी आपले विचार बाजूला ठेवत, गांधींशी यासंदर्भात चर्चा करण्याचे ठरवले आणि त्यासाठी ते वर्ध्याला गेले.

त्यावेळी 1930 ची सविनय कायदेभंग चळवळ थांबवण्यासाठी गांधी आणि व्हाईसरॉय आयर्विन यांच्यात एक (गांधी-आयर्विन) करार होणार होता. यासाठी 14 फेब्रुवारी 1931 रोजी गांधींनी व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विनकडे भेटीची वेळ मागितली होती. 16 फेब्रुवारीला आयर्विनला भेटण्याची वेळ मिळाली. याच्या एक दिवस आधी म्हणजे १५ फेब्रुवारीला बाबाराव सावरकर वर्धा आश्रमात पोहोचले होते.

या बैठकीत झालेली चर्चा पुढीलप्रमाणे-

बाबारावः आपण उद्या दिल्लीला जात आहात. तेथे सविनय कायदेभंगाची चळवळ थांबवण्याविषयी आपले व्हाईसरॉयशी बोलणे होऊन करार होईल. लोकपक्ष आणि सरकार यांच्यात जेव्हा असे करार केले जातात, तेव्हा राजबंद्यांना मुक्त करण्याची पहिली अट करारात असते. त्यामुळे आपणही पहिल्यांदा ही अट या करारात घालावी, अशी विनंती करायला मी आलो आहे.

गांधीः ठीक, मग त्यात विनंती कशासाठी? तशी अट मी घालणारच आहे.

बाबारावः पण राजबंद्यांमध्ये अत्याचारी आणि अनत्याचारी असा भेद केला जाऊ नये. जगात इतर कोठेही राजबंद्यांच्या बाबतीत असा भेद केला जात नाही. पण तसा कृत्रिम व अन्याय्य भेद आपल्याकडून केला जाईल, अशी मला भीती वाटते. त्यामुळे सर्वांच्या सुटकेची सरसकट अट घालावी, असे माझे विशेष मागणे आहे.

गांधीः हे पहा सावरकर, भेद करणे योग्य की अयोग्य हे आपण क्षणभर बाजूला ठेऊ. प्रतिपक्षाला जे देणे शक्य आहे, तेवढेच आपण मागावे. अधिक मागून समेट होण्यात अडचणी आणू नयेत, असे माझे धोरण आहे. तेव्हा अत्याचारी लोकांना सरकार सोडणार नाही हे जर निश्चित माहीत आहे, तर त्यांच्या सुटकेची मागणी करण्यात तरी काय अर्थ आहे?

बाबारावः मला आपले हे धोरण योग्य वाटत नाही. कारण ते जर योग्य असेल तर स्वराज्याची मागणी तरी कशी करता येईल? आपण स्वराज्य मागूच नये, कारण इंग्रज ते द्यायला तयार नाहीत.आपण आपले इकडचे तिकडचे फालतुक अधिकार मागावेत.

बाबारावांच्या या युक्तिवादावर महात्मा गांधींनी नेहमीप्रमाणे मौन धारण केले. थोड्या वेळाने त्यांनी चर्चेचा ओघ दुसरीकडे वळवला.

गांधीः हे पहा, अत्याचारी लोकांना सोडा म्हणणे हे हीनपणाचे आहे. ते मी करणार नाही. माझ्या अहिंसेच्या ब्रीदाविरुद्ध मी कसा जाऊ?

बाबारावः अत्याचारी राजबंद्यांना सोडण्याची मागणी आपल्याला हीन वाटते? मग स्वामी श्रद्धानंदांची हत्या करणा-या ‘भाई अब्दुल रशिदला क्षमा करा’ असे आपण हिंदू समाजाला आणि स्वामीजींच्या चिरंजीवांना सांगितलेत तो हीनपणा नव्हता? त्याच्यासाठी केलेला हीनपणा या शस्त्राचारी राजबंद्यांसाठी का करत नाही?

बाबारावांच्या या रोखठोक प्रश्नावर गांधींची मुद्रा बघण्यासारखी झाली. ते निरुत्तर झाले. पण कोणीतरी आपल्याला हाक मारत असल्याचा बहाणा करत ते उठले आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

या प्रसंगानंतरही बाबारावांचे क्रांतिकारी मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी गांधींना रजिस्टर्ड पत्र पाठवले, ज्यात त्यांनी भगतसिंह, राजगुरू यांच्यासह अन्य क्रांतिकारकांच्या सुटकेची मागणी केली. त्याला सुद्धा गांधींनी पुन्हा एकदा तसेच उत्तर दिले. यानंतर 5 मार्च 1931 ला गांधी-आयर्विन करार झाला. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत गांधींनी म्हटले-

गेल्या वर्षात कैद झालेले सत्याग्रह कैदी सुटतील, पण शस्राचारी राजबंदी तुरुंगातच खिचपत राहतील. मला त्यांच्या मुक्ततेचे न्याय्य समर्थन करता आले नाही. त्यांनी आपल्या अत्याचारी चळवळीपासून परावृत्त व्हावे, असे मी त्यांना पुन्हा सांगतो.

यावरुन असे दिसते की, आपल्याच देशातील लोकांवर अत्याचार करणा-या परकीयांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणा-या क्रांतिकारकांची सुटका, ही गांधींना ‘न्याय्य’ वाटत नव्हती. जर त्यावेळी बाबारावांची मागणी गांधींनी मान्य केली असती, तर भगतसिंह, राजगुरू यांच्यासारख्या असंख्य तरुण क्रांतिकारकांची फाशीची शिक्षा माफ झाली असती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.