ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे अशा रुग्णांबाबत डॉक्टरांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. 100 पैकी 4/5 रुग्णांच्या रक्त तपासणीत रक्त अजूनही घट्ट दिसून येत आहे. या रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यास हृदयविकाराचाही धोका आहे. विविध पालिका आणि सरकारी रुग्णालयात रक्ततपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या शरीरात रक्त घट्ट असल्याचे अजूनही दिसत आहे.
(हेही वाचा – SBI बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी; मिळेल ६३००० पर्यंत पगार, असा करा अर्ज!)
कोरोना होऊन बराच काळ लोटला आहे. त्यामुळे आता धोका टळल्याचे अनेकांना वाटते. श्वसनाचा व्यायाम न करणारे तसेच योग्य आहार न पाळणाऱ्या रुग्णांच्या शरीरात घट्ट रक्त तयार होते. रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन रुग्णांना हृदयविकाराचा धोका संभवतो, अशी माहिती ज्युपीटर रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. विजय सुरासे यांनी दिली. आरोग्याची काळजी न घेतल्यास रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण आजही दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील हृदयरोग विभागातील आणि चेस्ट मेडिसिन विभागातील डॉक्टर्स रुग्ण सतत चेकअपला येत नसल्याचे सांगतात. कोरोना झाल्यानंतर योग्य आहार न पाळणाऱ्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाचाही अजूनही त्रास आहे. कोरोनाचे विषाणू शरीरभर पसरल्यानंतर माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती क्षीण होते, त्यामुळे बराच काळ रुग्णाला सकस आहार घ्यावा लागतो, आता कोरोना होऊन वर्ष लोटल्याने बरेचसे रुग्ण व्यायाम आणि सकस आहाराकडे दुर्लक्ष करतात हे घातक ठरू शकते, अशी भीतीही डॉक्टरांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community