ऑनलाईन फसवणुकीत चोरलेली रक्कम परत मिळवायची असेल तर मग ‘ही’ प्रक्रिया करा

100

सायबर गुन्हेगारी ही संपूर्ण देशाला मोठी डोकेदुखी झाली आहे. सायबर गुन्हेगार हे देशातूनच नाही तर देशाच्या बाहेर बसून ऑनलाईन फसवणूक करीत आहे. केवायसी अपडेट, वीजबिल कनेक्शन, डेबिट क्रेडिट कार्ड फ्रॉड, सेक्सटोर्सन इत्यादी प्रकरणात दररोज भारतात हजारोच्या संख्येने लोकांची फसवणूक होत आहे.

फसवणूक झालेली रक्कम ही कुठल्या न कुठल्या बँक खात्यामार्फतच सायबर गुन्हेगाराकडे पोहचत असते. ऑनलाईन फसवणुकीतून गेलेली रक्कम परत मिळेल की नाही याची शाश्वती खूप कमी असते. परंतू ऑनलाईन फसवणुकीला बळी पडलेल्या व्यक्तीला गेलेली रक्कम ‘गोल्डन अवर्स’ मध्ये मिळवता येते. मुंबईतील सांताक्रूझ पोलिसांनी गेल्याच आठवड्यात ऑनलाईन फसवणुकीत आठ लाख गमावलेल्या दोन व्यक्तींची गोल्डन अवर्समध्ये रक्कम परत मिळवून दिली. या दोन व्यक्तींची हॉटेल बुकिंग आणि बँक केवायसी अपडेटच्या बहाण्याने आठ लाख रुपयांची फसवणूक झाली होती, या दोघांच्या खात्यावरून रक्कम जाताच काही तासांत या दोघांनी पोलिसांशी संपर्क साधला. ‘गोल्डन अवर्स’ मध्ये तक्रार येताच पोलिसांनी तात्काळ संबंधित बँकांसोबत समन्वय साधत ही रक्कम सायबर गुन्हेगाराच्या खात्यात जाण्यापूर्वी थांबविण्यात आली. फसवणूक झाल्याच्या काही तासांत (गोल्डन अवर्स) मध्ये हे दोन्ही तक्रारदारांनी पोलिसांकडे संपर्क साधल्यामुळे हे शक्य होऊ शकले असे पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

(हेही वाचा पाच हक्कभंग प्रस्ताव आले; पण निर्णय घेण्यासाठी विधानपरिषदेत हक्कभंग समितीच नाही!)

ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या दोन ते तीन तासांचा हा गोल्डन अवर्स असतो, या वेळेत तक्रारदार पोलिसांकडे येऊन तक्रार दाखल करून सर्व माहिती पोलिसांना दिल्यानंतर सर्वात प्रथम पोलिसांकडून ही रक्कम दुसऱ्या खात्यावर वळती होण्याच्या कालावधीच्या आतमध्ये संबंधित बँकांशी संपर्क साधला जातो, बँक अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळती होऊ दिली जात नाही, असे सायबर पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे.

फसवणूक झाल्यानंतर तक्रारदार यांनी वेळ न दडवता दोन ते तीन तासांच्या आत पोलीस ठाणे अथवा ‘१९३०’ या क्रमाकावर संपर्क साधल्यास ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम परत मिळवणे शक्य होते असे पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे. १९३० हा क्रमांक सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक फसवणुकीसाठी टोलफ्री क्रमांक आहे, हा क्रमांक संपूर्ण भारतासाठी असून भारतात कुठेही फसवणूक झाल्यावर गोल्डन अवर्समध्ये या क्रमांकावर कॉल करून माहिती दिल्यास फसवणूक झालेली रक्कम परत मिळण्याची शक्यता असते असे पोलिसांनी सांगितले. मुंबईत मागील ३ महिन्यांत सायबर फसवणुकीत झालेल्या गुन्हयात गोल्डन अवर्समध्ये सुमारे २० पेक्षा अधिक जणांची रक्कम परत करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.