‘त्या’ रेव्ह पार्टी प्रकरणात आता बंगल्याच्या मालकाला अटक

२२ जणांना अटक करण्यात आली असून, यात १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे.

इगतपुरी येथील एका बंगल्यात रंगलेल्या रेव्ह पार्टीचे कनेक्शन थेट मुंबई पुण्याशी जोडले गेले आहे. या रेव्ह पार्टी प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, त्यात बंगल्याचा मालक रणजित सोनी याचा देखील समावेश आहे. या गुन्ह्यात आरोपींची संख्या २९ झाली आहे. बंगल्याच्या मालकासह इतर चार जणांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, पाचही जणांना ५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर आरोपी ९ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

बर्थडे नाही, रेव्ह पार्टी

मुंबईत राहाणारा पियुष सेठिया आणि त्याच्या इतर चार मित्रांनी या पार्टीचे आयोजन केले होते. २७ जून रोजी पियुषचा वाढदिवस होता. वाढदिवस जोरात साजरा करायचा म्हणून पियुष आणि त्याच्या काही मित्रांनी महिन्याभरापासून या पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी पियुषने मुंबईत राहणारे सोनी नावाचे व्यवसायिक यांच्या इगतपुरी येथे असलेल्या ‘स्काय ताज व्हिला’ आणि त्याच्या शेजारी असलेल्या आणखी एका बंगल्यात पार्टीची व्यवस्था केली होती. या पार्टीसाठी मुंबई आणि पुण्यातील मित्र-मैत्रिणींना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये बॉलिवूड संबंधी काही लोक आणि मराठी अभिनेत्रीचा देखील समावेश होता.

(हेही वाचाः नाशिकमध्ये रेव्ह पार्टीचा पर्दाफाश! 22 जणांवर कारवाई)

होती बारीक नजर

दोन आठवड्यांपासून या बंगल्यात सामानाची जुळवाजुळव सुरू होती. खाण्याचे सामान, नशेच्या वस्तूंनी दोन्ही बंगले भरले होते. खास मुंबईतून एका नायजेरियन इसमाकडून चरस, गांजा असे अंमली पदार्थ मागवण्यात आले होते. हुक्का, दारू, आणि ड्रग्स या तिन्ही नशेच्या वस्तू बंगल्यात आणल्या गेल्या होत्या. बंगल्यात सुरू असलेल्या हालचालींवर कुणाची तरी बारीक नजर होती, या बंगल्यात काहीतरी होणार असल्याचा संशय नजर ठेवणाऱ्याला होता.

पोलिसांची छापेमारी

अखेर तो दिवस आला. शनिवारी सायंकाळी पर्यंत बंगल्यातील रेलचेल वाढली होती. महागड्या मोटारींनी बंगल्याचा परिसर भरला होता. जसजसा काळोख पडू लागला, तसतशी बंगल्यातील रोषणाईने वातावरणात रंग उधळायला सुरुवात केली. गाण्याचा आवाज येऊ लागला होता, बंगल्यातील पार्टीला हळूहळू धुंदी चढू लागताच, या रेव्ह पार्टीची खबर नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना लागली. सचिन पाटील यांनी इगतपुरी पोलिसांना सूचना देऊन, रविवारी रात्री दोन्ही बंगल्यांवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, मद्य, हुक्का सापडले. तसेच पोलिसांनी झिंगलेल्या अवस्थेत असणाऱ्या २२ जणांना ताब्यात घेऊन, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

(हेही वाचाः कर्जतमध्ये उधळली पार्टी; ३४ उच्चभ्रू पर्यटकांवर गुन्हा दाखल)

१० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश

ताब्यात घेतलेल्यांमध्ये मॉडेल, बॉलिवूड अभिनेत्री यांचा समावेश होता. याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन, २२ जणांना अटक करण्यात आली. यात १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने ४ जणांना १ दिवसाची, तर इतरांना ९ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मंगळवारी इगतपुरी पोलिसांनी बंगल्याचा मालक रणजित सोनी याला अटक केली असून, इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. एका दिवसाच्या पोलिस कोठडीत असणाऱ्या चौघांसह बंगल्याचा मालक रणजित सोनी यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना ५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here