ठाणे- कल्याण रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गाचा उपयोग काय?

२०१९च्या लोकसभा निवडणुकींच्या आधी रेल्वे मंत्रालयाने आणि रेल्वे प्रशासनाने जनतेला खूश ठेवण्यासाठी अनेक लोकप्रिय घोषणांची जंत्री लावली होती. त्यात नवे पादचारी पूल, फलाटांवर एस्केलेटर्स, रेल्वे फाटक बंद करणे, उड्डाणपूल, मध्य रेल्वेचे रखडलेले अनेक प्रकल्प, पाचवी – सहावी मार्गिका, ठाणे ऐरोली मार्ग, कल्याण ऐरोली मार्ग, कल्याण रेल्वे यार्डाचा पुनर्विकास ( remodelling ), चिखलोली येथील नवे रेल्वे स्थानक, अंबरनाथ येथे दोन्ही बाजूंनी उतारण्यायोग्य होम प्लॅटफॉर्म आणि विस्तार , कल्याण – बदलापूर तीसरी लाईन, कल्याण कसारा तीसरी लाईन, कर्जत पनवेल उपनगरीय रेल्वे, कल्याण – वाशी, कल्याण पनवेल उपनगरीय वाहतूक, ठाणे कर्जत, ठाणे खोपोली सेवा वाढवणे अश्या अनेक अनेक घोषणांचा समावेश होता. MUTP III A आणि MRVC द्वारे ही सगळी कामे हाती घेण्यात येणार होती. याला कारण ठरले होते ती म्हणजे २०१७ मध्ये परळ स्टेशन येथील रेल्वे फूट ओव्हर ब्रिज( FOB ) दुर्घटना ज्यामध्ये २२ लोकांचा मृत्यू तर सुमारे ३० लोकं जखमी झाले. या दुर्घटनेचे महत्त्वाचे कारण होते अतिशय अपुरे, लहान रेल्वे फूट ओव्हर ब्रिज लोकांचा निष्काळजीपणा आणि रेल्वेची अनास्था दुर्लक्ष.

यानंतर जे जागोजागी एस्केलेटर्स उभारले गेले त्यांची काय स्थिती आहे हे पाहणे सुद्धा गमतीशीर आहे. यातील बरेचसे एस्केलेटर्स बसवताना केलेल्या नियोजनाचा पार बोऱ्या निघालेला होता इतके ते शून्य होते उदाहरणार्थ म्हणून आपण अंबरनाथ रेल्वे स्थानकांच्या पूर्वेला बसवलेल्या एस्केलेटरचे पाहिले तर या एस्केलेटरचा खरा उपयोग आणि वापर गर्दीच्या आणि इतरवेळी ज्यांना जिने चढणे, उतरणे कठीण असते अशा ज्येष्ठ, अपंग, दिव्यांग, किंवा जड सामान वाहणाऱ्या माणसांसाठी सोय म्हणून केलेला असतो कारण की त्यांना पायऱ्या चढाव्या लागू नये. मात्र ही गोष्ट अंबरनाथचे एस्केलेटर बांधताना लक्षात घेतली गेली नसावी. कारण अंबरनाथ पूर्वेचे एस्केलेटर वापरण्यासाठीच आधी पायऱ्या चढाव्या लागतात. त्या एस्केलेटर उपयोग करून जेव्हा प्रवासी रेल्वे फूट ओव्हर ब्रिजवर पोहोचतो तो ब्रिजच मुळात जुना व धोकादायक झालेला होता. सद्यस्थितींत तो ब्रिज पडून टाकला आहे, त्या ब्रिजवर पोहचण्यासाठी जो पूर्वीचा पायऱ्यांचा जिना होता तो ही आता पडून टाकला आहे आणि एस्केलेटर ही आता विना वापर बंद पडलेला आहे.. आणि प्रवासी रेल्वे ट्रॅक मधूनच रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटावर जात आहेत याचा काय उपयोग ? अशी अडचणीची, चुकीच्या ठिकाणी एस्केलेटर बांधण्यापूर्वी तांत्रिक पाहणी केली जात नाही का ? की केवळ टेंडर महत्वाचे ? अशीच उदाहरणे प्रत्येक स्थानकावरील प्रवासी आपापल्या स्थानकातील देऊ शकतात . म्हणजे नको तो एस्केलेटर आपलं जिनाच बरा… असून अडचणच आणि खोळंबा तर सदानकदा आहेच.

घोषणा केवळ कागदांवरच

दुसरा किस्सा ठाणे कल्याण मधील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा. २०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असणारे हे काम लांबत गेले आणि मग आलेल्या कोरोना लॉकडाऊनमुळे ते अधिकच रखडले. आता नुकतेच काही दिवसांपूर्वी  पंतप्रधानांच्या हस्ते या मार्गिकांचे लोकार्पण केले गेले. ज्यात त्यांनी उदघाटन करताना उपनगरीय प्रवाश्यांना फायदा मिळेल असे भाषण केले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ते होताना दिसत नाहीच उलट विलंब होत आहे. ठाणे व दिवा स्टेशन दरम्यान नवीन मार्गिका सुरू करूनही उपनगरीय लोकल गाड्यांची विलंबानेच धावत आहेत. जून्या पारसिक बोगद्यातून सर्व जलद मेल एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक होणे अपेक्षित आहे ज्या योगे उपनगरीय गाड्यांसाठी मार्गिका सदैव उपलब्ध राहील, crossing चा प्रॉब्लेम solved होईल व दोन्ही उपनगरीय व मेल एक्सप्रेस गाड्यांची सुविधा वेळेवर राहील. परंतू असे न होता मेल एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक पुन्हा उपनगरीय ट्रॅक वरूनच होत असल्याने उपनगरीय रेल्वे सेवा विलंबानेच धावत आहेत. मग त्या पाचव्या सहाव्या मार्गाचा उपयोग काय? तो होत नाहीच आहे. अंबरनाथ बदलापूर मधील प्रस्तावित चिखलोली स्थानक व इतर घोषणाही केवळ कागदांवरच राहिलेल्या आहेत, अपूर्ण, रखडलेल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here