मुंबईच्या समुद्रात उभ्या राहिल्या झोपड्या! आता जमीन संपली समुद्रावरही झोपडपट्टीदादांचे अतिक्रमण

२६/११च्या हल्ल्यानंतर मुंबईतील समुद्र किनाऱ्याची सुरक्षा वाढविण्यात आली होती. मात्र मुंबईतील काही झोपडपट्टीदादांकडून सुरक्षा भेदून समुद्रात झोपड्या उभ्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील बंदरापैकी ‘कौला बंदर’ येथे समोर आला आहे. अतिक्रमण करण्यासाठी मुंबईतील जमिनी संपल्या की काय म्हणून आता समुद्रातही अतिक्रमण सुरू झाले आहे, समुद्रच गिळंकृत करू पाहणाऱ्या झोपडपट्टीदादांच्या डोक्यावर नक्की कुठल्या पुढाऱ्याचा हात आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

समुद्राच्या आत लाकडी बांबू रोवून झोपड्या बांधल्या

मुंबईवर १४ वर्षांपूर्वी म्हणजे २६ नोव्हेंबर २००९ मध्ये दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश करून मुंबईवर हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातील समुद्र किनारे सुरक्षित करण्यात आले आहे. समुद्र मार्गाने पुन्हा या प्रकारचा हल्ला होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेण्यात आलेली असताना मुंबईतील महत्वाचे असणाऱ्या बंदरापैकी शिवडी येथे असणाऱ्या ‘कौला बंदर’ या ठिकाणी समुद्रात अतिक्रमण करण्यात आले आहे. झोपडपट्टीदादांनी समुद्राच्या आत लाकडी बांबू रोवून त्याच्यावर झोपड्या बांधल्या असून त्या परराज्यातून आलेल्या मजुरांना विकण्यात आलेल्या आहेत.

(हेही वाचा महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे शालांत परीक्षेमध्ये १०० टक्के सुयश)

या झोपड्यांमध्ये वीज, पाणी देखील पुरविण्यात आलेली असल्याचे समोर आले असून हे नक्की कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. समुद्रात चारही बाजुंना बांबू रोवून या झोपड्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने हे खूप धोकादायक असल्याचे जाणकारांचे मत आहे. याबाबत स्थानिक सुरक्षा यंत्रणा म्हणजेच मुंबई पोलीस यांच्याकडे याबाबत विचारले असता ही जमीन मुंबई पोर्ट ट्रस्टची जमीन आहे, त्यामुळे झोपड्या हटवणे हे त्यांचे काम असून आम्ही त्यांना सुरक्षा देऊ, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या झोपड्या गेल्या काही वर्षांपासून उभ्या करण्यात आलेल्या असून मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी त्याची दखल घ्यावी असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

कौला बंदर काय आहे?

मुंबईतील इतर बंदरापैकी कौला बंदर एक असून या ठिकाणी परदेशातून येणारे मालवाहू जहाज यायचे व त्यातून आपला माल खाली करण्यात येत असे, या बंदरात कौलाचा माल उतरत होता म्हणून त्याला कौला बंदर असे नाव पडले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here