देशभरात यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यांत उष्णतेची रेकोर्ड ब्रेक नोंद झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण देशभरात पस्तीशीपुढे गेलेल्या कमाल तापमानाने सरासरी तापमानातील १२२ वर्षांच्या मार्च महिन्यातील रेकॉर्ड मोडला. तर एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेश या वायव्य आणि मध्य भारतात मोडणा-या राज्यांनी कमाल तापमानातही १२२ वर्षांच्या सरासरी कमाल तापमानाचा रेकॉर्ड मोडला.
येत्या मे महिन्यातही राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटांचा मारा सुरुच राहील तर त्या तुलनेत महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचा मारा सतत राहणार नाही, असा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केला. विदर्भात यंदा ४५ अंशाच्या पुढे कमाल तापामान नोंदवले जात आहे. पुढील पाच दिवसांतही विदर्भात फारशी परिस्थिती बदलणारी नाही. या भागांतील कमाल तापमानावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा यांनी दिली.
(हेही वाचा – वकील सदावर्तेंनंतर जयश्री पाटील यांची अटक टळली)
मार्चमध्ये संपूर्ण भारत उष्णतेने होरपळला
मार्च महिन्यात संपूर्ण भारत उष्णतेने होरपळला होता. त्या तुलनेत देशातील ईशान्य आणि दक्षिणेकडील राज्यांत तापमान भडका नसेल. राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यात मे महिन्यात कमाल तापमान ४५ अंशाच्या आसपासच राहते. गुजरात आणि मध्य प्रदेशातही कमाल तापमानातही थोडी जास्त वाढ दिसून येईल.
किमान तापमानही वाढणार
रात्रीचे तापमान वाढण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती असल्याने मे महिन्यात राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच गुजरात राज्यात मुख्यत्वे किमान तापमानातही वाढ दिसून येईल. काहीशा फरकाने महाराष्ट्रातील किमान तापमानातही वाढ नोंदवली जाईल.
Join Our WhatsApp Community