आला रे आला… मान्सून राज्यात आला

तब्ब्ल आठवड्याभराच्या विलंबानंतर नैऋत्य मोसमी वारे अखेर राज्यात दाखल झाल्याची घोषणा भारतीय वेधशाळेने केली. मान्सून राज्यात गोव्याच्या मार्गाने थेट वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचला. पुढच्या दोन दिवसांत मान्सून राज्यात अजून पुढे सरकेल, अशी सुखदवार्ताही भारतीय वेधशाळेने दिली.

( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कसा निश्चित केला जातो? जाणून घ्या कसा होणार फायदा )

गेल्या दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस सक्रीय झाला होता. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पूर्वमोसमी पावसाची पडला. गुरूवारी रात्री मुंबईतही पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. एवढे दिवस वरूणराजाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरतेने प्रतीक्षा लागली होती.

अखेर शुक्रवारी दुपारी भारतीय वेधशाळेने गोवा आणि महाराष्ट्रात मान्सूनने प्रवेश केल्याचे जाहीर केले. संपूर्ण गोवा काबीज करत कर्नाटकातील काही भाग व्यापणारा मान्सून दोन दिवसांत उर्वरित कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग आणि महाराष्ट्र राज्यातही पुढे सरकेल, असा अंदाज भारतीय वेधशाळेने जाहीर केला आहे.

कोल्हापूर, रत्नागिरी आणि रत्नागिरीत जोमाने वारे वाहणार

मान्सूनची आगेकूच होत असताना अपेक्षित भागांत मान्सूनच्या प्रवेशाअगोदर वावटळीसह पाऊस होतो. येत्या ३-४ तासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळलीत, असा अंदाजही मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here