21वे शतक हे प्रगतीचं शतक म्हणून ओळखलं जातं. आपण सध्या विज्ञानयुगात आहोत, असं लहानपणी अनेकदा निबंधांमध्ये लिहिलं होतं. तेव्हा त्याचा अर्थ कळत नव्हता, पण आज प्रत्यक्ष प्रचिती अनुभवत आहोत. घरात बसून कधी काम, शिक्षण होऊ शकतं हा साधा विचारही आपण केला नव्हता, पण आज ते शक्य झालं आहे. ते केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच. अगदी प्रत्येक क्षेत्रात आज तंत्रज्ञान आपली सोबत करत आहे. त्यामुळे यंत्राप्रमाणेच माणसालाही आज सतत अपडेट रहावं लागत आहे. कारण आज मानवाची यंत्राशी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत जर आपण हरलो, तर आज ‘यंत्रमानवाचा’ही पर्याय आहे.
एकीकडे कमी खर्चात जास्त उत्पादनक्षमता आणि दुसरीकडे लोकांसाठी अधिक अनिश्चित रोजगार हा एक मोठा संघर्ष सध्या सुरू आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात हा संघर्ष अधिक पेटून उठला आहे. वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अकुशल कामगारांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) या जागतिक संघटनेच्या संशोधनात समोर आली आहे. अकुशल कामगारांची जागा यंत्रमानव घेत असल्यामुळे, अशा कामगारांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक विषमतेचा पुढील काळात सामना कारावा लागू शकतो, असे आयएमएफने म्हटले आहे.
काय आहे आयएमएफचे संशोधन?
2000 ते 2018 या 18 वर्षांच्या काळात आलेल्या विविध साथीच्या रोगांच्या काळात, इंटरनॅशनल फेडरेशन रोबोटिक्सच्या अहवालानुसार, 40 देशांतील 18 विविध उद्योगांमध्ये यंत्रमानवांनी माणसांची जागा घेतली आहे. जेव्हा एखाद्या साथीच्या आजाराचा आरोग्यावर तीव्र परिणाम होतो आणि साथीच्या आजाराचा संबंध एखाद्या महत्त्वपूर्ण आर्थिक मंदीशी असतो तेव्हा, माणसांपेक्षा रोबोटचा जास्तीत जास्त वापर केला जातो, असा आयएमएफने अंदाज वर्तवला आहे.
How can #pandemics affect #automation and #inequality? Read our #IMFBlog https://t.co/i0XIZ66xpK pic.twitter.com/zkow4Yck0W
— IMF (@IMFNews) April 20, 2021
साथीच्या आजारात का वाढतो रोबोटचा वापर?
साथीच्या आजारानंतर प्रत्येक क्षेत्रातील उद्योगाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. प्रत्येक उद्योग सावरण्याची धडपड करत असतो. मंदीनंतर बसणा-या मोठ्या धक्क्यानंतर कंपन्या त्यांच्या व्यवसायाची पुनर्ररचना करतात. त्यासाठी त्यांना कमीत-कमी खर्चात, जास्तीत-जास्त उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज असते. त्यामुळे कंपन्या अकुशल कर्मचा-यांवर होणारा खर्च कमी करुन, त्याजागी तंत्रज्ञानाचा जास्तीत-जास्त वापर करतात. तसेच माणसांची जागा यंत्रांनी घेतल्याने आरोग्यविषयक जोखीम राहत नाही आणि कुठल्याही परिस्थितीत उत्पादनाला कधीही खिळ बसत नाही, हे एक महत्तवाचे कारण असल्याचे आयएमएफने आपल्या संशोधनात स्पष्ट केले आहे.
After a #pandemic, #inequality rises more in countries where #automation has increased more. Read our #IMFBlog https://t.co/i0XIZ66xpK pic.twitter.com/etr14N3zG4
— IMF (@IMFNews) April 20, 2021
रोबोट्स कुशल कामगारांपेक्षा अकुशल कामगारांच्या रोजगारावर जास्त परिणाम करतात आणि त्यामुळे अशा अकुशल कामगारांच्या विस्थापनाचा मोठा प्रश्न विषमतेच्या गतिमानतेस अधिक बळकट करतो, असेही आयएमएफचे म्हणणे आहे.
काय आहेत उपाय?
अशी विषमता निर्माण होऊ नये म्हणून धोरणे ठरवताना प्रशासनाने अत्यंत असुरक्षित लोकांच्या रोजगारावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोना नंतरच्या काळात तंत्रज्ञानाची गती वाढणार असल्याने अनेक अकुशल कामगारांना नवीन रोजगार शोधण्याची आवश्यकता भासणार असल्याचे, आयएमएफने आपल्या संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे निर्माण होणारी विषमता टाळण्यासाठी अकुशल कामगारांचा कौशल्य विकास करण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणे जास्त आवश्यक आहे. त्यासाठी विविध तांत्रिक प्रशिक्षण देणे, प्रशिक्षण संस्थांची उभारणी करुन त्यात शिक्षण घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे, आयएमएफचे म्हणणे आहे. तंत्रज्ञानाला पर्याय नसला तरी समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाचा धोरणकर्त्यांनी विचार करणे आवश्यक आहे. बदलत्या जगाच्या वेगवान गतीत कौशल्याच्या अभावामुळे मागे राहणा-यांना, सोबत घेऊन धाव घेतली तरच समाजातील प्रत्येकाचे कल्याण साधता येईल, हा संदेश आयएमएफने आपल्या या संशोधनातून दिला आहे.
आयएमएफ म्हणजे काय?
दुस-या महायुद्धानंतर जागतिक महामंदीतून सावरण्यासाठी 1945 साली या संस्थेची निर्मिती करण्यात आली. ही संस्था एका मध्यवर्ती बॅंकेची भूमिका निभावते. आर्थिक स्थैर्य निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवणे ही या संस्थेची महत्त्वाची कार्ये आहेत. जागतिक बॅंकेचे ज्या देशांना सदस्यत्त्व प्राप्त होते, त्या देशांना आयएमएफचे सदस्यत्त्व आपोआप मिळते. सध्या भारतासह 189 देश आयएमएफचे सदस्य आहेत.
Join Our WhatsApp Community