शिवनेरीवरील छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे महत्व!

216

भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या दरम्यान किल्ले शिवनेरी येथे साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जन्मोत्सव सोहळ्याची माहिती दिली. दिनांक १८ फेब्रुवारी रोजी या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. १९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यासाठी सुमारे १ लाख शिव-भक्त उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज सबंध हिंदुस्थानचे दैवत आहेत. महाराष्ट्र भूमीचे हे भाग्य आहे की असे दिव्य पुरुष या भूमीत अवतरले आणि म्हणूनच मराठी माणूस हा भाग्यशाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्व मराठी माणसामध्ये इतके भिनले आहे की फाळणीचे घाव बंगाल आणि पंजाबला सोसावे लागले परंतु आपल्यावर झालेल्या अत्याचाराची जाणीव या दोन्ही राज्यांना नाही, मात्र महाराष्ट्राला वेळोवेळी याची जाणीव झाली आहे.

पण १९६० नंतर महाराष्ट्रात भ्रष्ट विचारांची चळवळ राबवली गेली, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडण्यात आला. लोकमान्य टिळकांनी शिव जयंती साजरी करुन सर्व हिंदुंना एकत्र आणले, सावरकरांनी आपल्या राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानलं. ‘हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ अशी आर्त साद सावरकरांनी घातली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन हिंदू साम्राज्य दिवस असे केले. हा संघाचा एक महत्त्वाचा उत्सव मानला जातो.

शिवसेनेचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महाराष्ट्रात तळागाळात पोहोचवण्यासाठी झाला असला तरी उद्धव ठाकरे हे शिवाजी महाराजांच्या विरोधकांच्या गटात गेले आणि बाळासाहेबांनी जी चळवळ सुरु केली होती, त्यास पूर्णविराम लागला. परंतु सुदैवाने फडणवीसांच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले की आपण औरंगजेबाचा, अफझलखानाचा उदोउदो करणाऱ्यांसोबत संसार करु शकत नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा शिवसैनिकांना शिवाजी महाराजांच्या जवळ आणून ठेवले.

सध्या ज्या प्रकारचे नॅरेटिव्ह सेट केले जात आहे त्यादृष्टीने यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव महत्त्वाचा ठरणार आहे. १९ फेब्रुवारी रोजीच्या महाआरतीमध्ये प्रत्येक भारतीय जो भारताला पितृभू आणि पुण्यभू मानतो, तो प्रत्यक्षात किंवा आपल्या सोयीच्या ठिकाणाहून सहभागी होणार आहे. या आरतीमध्ये प्रज्वलित होणाऱ्या दीपातून नकारात्मकतेचे वातावरण नष्ट होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू विचारांनी आकाश उजळणार आहे, यातून होणाऱ्या टाळ आणि घंटानादातून औरंगजेबाच्या संस्कृतीतल्या लोकांच्या ह्रदयाचे ठोके चुकणार आहेत आणि शिवाजी महाराजांच्या परंपरेतल्या शिवभक्तांना समाजात सकारात्मकता आणि हिंदू भावविश्व निर्माण करण्यासाठी बळ मिळणार आहे. यंदा शिवराज्याभिषेकाचे ३५०वे वर्षे आहे. हा उत्सव भव्य असणार आहे यात वाद नाही. या उत्सवाची सुरुवात शिवजन्मोत्सवापासून होणार आहे. आता भारताची सुराज्याकडे यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे आणि आपला महाराष्ट्र त्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.