पोईसर नदीकाठच्या ‘त्या’ हटवलेल्या झोपड्यांच्या जागी १५ दिवसांत उभी राहिली संरक्षक भिंत

मुंबईतील आर/दक्षिण परिसरातून वाहणा-या पोईसर नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी, पहिल्या टप्प्यात प्राधान्यक्रमानुसार आत्यंतिक गरजेचे आहे, अशा भागातील २९ बांधकामे हटविण्याची कारवाई काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आली होती. सदर ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेवून महानगरपालिकेने अवघ्या १५ दिवसात पूर्ण केले आहे. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यात कांदिवलीतील डहाणुकरवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळू शकेल, याची प्रशासनाला खात्री आहे.

पुलामुळे पावसाच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा

कांदिवली (पश्चिम) येथील डहाणूकर वाडी क्षेत्रातून वाहणार्‍या पोईसर नदीचा उगम राजीव गांधी राष्ट्रीय अभयारण्य क्षेत्रातील डोंगर रांगामध्ये होऊन ही नदी मालाड (पूर्व) स्थित क्रांतीनगर झोपडपट्टीतून नगरात प्रवेश करते. अनेक प्रभागातून वाहत येणाऱ्या या नदीचा प्रवाह कांदिवली (पश्चिम) मधील डहाणूकर वाडीत वसलेल्या बेट वस्तीमुळे दोन प्रवाहात विभागला जातो. पुढे दोन्ही प्रवाह एकत्र येऊन मालाड (पश्चिम) मध्ये मार्वे खाडीला जाऊन मिळतात. डहाणूकरवाडी वस्तीमुळे विभाजित पोईसर नदीकाठच्या होणाऱ्या दोन प्रवाहापैकी ‘ब’ प्रवाह हा नदी पात्रातील झोपड्यांच्या अतिक्रमणामुळे खूप अरुंद होतो. तसेच त्या ठिकाणी बांधलेल्या पुलामुळे पावसाच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण होतो. परिणामी जोरदार पावसाच्या प्रसंगी पुराचे पाणी शिरून डहाणूकर वाडी परिसरातील रहिवाश्यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागते.

(हेही वाचा – …हा गोपनीयतेचा भंग नाही का? सोमय्यांचा निवडणूक आयोगाला सवाल)

तातडीने तोडगा काढण्यासाठी BMC चे निर्देश

स्थानिक रहिवाश्यांना मागील काही वर्षे पावसाळ्यात अशा कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला वारंवार विनंती केली होती. प्रशासनाने देखील वेळोवेळी निरनिराळे प्रयत्न केले, विविध उपाययोजना हाती घेतल्या. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नदीपात्राचे रुंदीकरण करण्याचे काम सन २०१८ पासून करण्याचे नियोजित होते. मात्र, या ठिकाणी वसलेल्या झोपडीधारकांच्या विविध मागण्यांमुळे पर्यायाने त्यातून उद्भवणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणीमुळे आर/दक्षिण विभागाला या प्रवाहपात्रातील झोपड्या हटविणे शक्य होत नव्हते. परिणामी पर्जन्यजल वाहिन्या विभागालाही या ठिकाणी नदीपात्राचे नियोजित रुंदीकरण करता आले नाही. याप्रकरणी वारंवार होणार्‍या तक्रारींची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू याप्रकरणी विशेष लक्ष देवून तातडीने तोडगा काढण्यासाठी उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांना सविस्तर निर्देश दिले.

नदी प्रवाहास होणारा अडथळा दूर

निर्देशानुसार उपायुक्त (परिमंडळ ७) भाग्यश्री कापसे आणि आर/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या २९ झोपड्या तोडण्यात आल्या. त्यानंत २४ मे २०२२ रोजी या ठिकाणी पुन्हा पाहणी करून आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रवाहातील अडथळा हटवून संरक्षक भिंतीचे कामही युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश वेलरासु यांनी दिले होते. या निर्देशानुसार, तोडलेल्या झोपड्यांचा ढिगारा हटवून संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याची कार्यवाही पर्जन्य जलवाहिनी विभागाने ताबडतोब सुरू केली. अवघ्या १५ दिवसात संरक्षक भिंतीचे काम ११ जून २०२२ रोजी युद्ध पातळीवर पूर्णत्वास नेले आहे. संरक्षक भिंतीचे हे काम पूर्ण झाल्याने नदी प्रवाहास होणारा अडथळा दूर झाला आहे. परिणामी, डहाणूकरवाडी क्षेत्रातील रहिवाशांना यंदाच्या पावसाळ्यात निश्चितच मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here