गेल्या आठवड्याभरात मुंबईत आणि नवी मुंबईत अवयवदान प्रत्यारोपण समितीच्यावतीने पाच जणांना नवे आयुष्य मिळाले. यापैकी एकाला नवा हातही मिळाला आहे. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पडली. १८ जानेवारी रोजी नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात ५३ वर्षीय महिलेने मृत्यूनंतर यकृत दान करत एका गरजू रुग्णाच्या आयुष्याला नवी संजीवनी दिली. या महिलेकडून यंदाच्या वर्षाच्या अवयवदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.
गिरगाव येथील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात ५१ वर्षीय संजय मनोहरलाल सिसोदिया या मेंदू मृत रुग्णाच्या मुलांनी पुढाकार घेऊन तीन जणांचे आयुष्य वाचवले. संजय सिसोदिया यांना चक्कर आणि असंतुलनाची तक्रार होत असल्याने त्यांना १७ जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिसोदिया यांना दीर्घकाळ मधुमेह असल्याने त्यांच्या लहान मेंदूला स्ट्रोक आला होता. शस्त्रक्रियेनंतरही त्यांच्यावर चाचण्या पार पडल्यानंतर डॉक्टरांनी शनिवारी त्यांना मेंदू मृत घोषित केले. दोन मूत्रपिंडे आणि यकृत अवयवदान करण्याचे मुलांनी सूचवल्यानंतर एक मूत्रपिंड सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि दुसरे नानावटी तर यकृत धीरुबाई अंबानी रुग्णालयात दान करण्यात आले.
(हेही वाचा – मुंबईकरांनो…गारठलेल्या थंडीत बाहेर पडताय? अशी घ्या काळजी )
हाताच्या प्रत्यारोपणाची यंदाच्या वर्षातील पहिली शस्त्रक्रिया
नुकतीच परळ येथील ग्लोबल रुग्णालयात हाताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. बुलडाणा येथील ३५ वर्षीय महिलेने वीजेच्या धक्क्यामुळे दोन्ही हात गमावले होते. गेली चार वर्ष त्या हाताच्या प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत होत्या. अखेर त्यांना काही दिवसांपूर्वीच गुजरात राज्यातील एका मृत रुग्णाकडून दोन हात शस्त्रक्रियेतून प्रत्यारोपणासाठी मिळाले. परळ रुग्णालयातील डॉ निलेश सातभाई यांच्याकडून ही अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. मुंबईत पार पडलेली ही पाचवी हाताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आहे.
Join Our WhatsApp Community