अंबरनाथमध्ये रविवारी कोसळलेल्या पावसामुळे जमीन खचून एका घराची भिंत दुस-या घरावर कोसळली. यामुळे एकाच घरातील तिघे जण जखमी आहेत. यापैकी दोघांना गंभीर इजा झाली आहे, तर एक किरकोळ जखमी आहे.
अंबरनाथ पूर्वेतील आंबेडकर नगर भागात ही घटना घडली. या परिसरात काही घरे टेकडीवर असून काही घरे खालच्या भागात आहेत. रविवारी रात्रभर या भागात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे टेकडी परिसराची जमीन काहीशी खचली आणि टेकडीवर असलेल्या एका घराची भिंत खालच्या भागात राहणा-या दिलीप सुरवाडे यांच्या घरावर कोसळली.
( हेही वाचा: हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’? )
झोपलेले असताना घडली दुर्घटना
ही घटना घडली त्यावेळी सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे दिलीप सुरवाडे हे कामावर जायला निघाले होते. तर त्यांची पत्नी आणि मुलगा झोपलेले होते. अचानक घराच्या पत्र्यावर भिंत कोसळ्याने पत्रा, अॅंगल आणि भिंतीचा ढिगारा या सर्वांच्या अंगावर पडला. त्यामुळे दिलीप सुरवाडे आणि त्यांची पत्नी बेबी सुरवाडे या दोघांना डोक्याला गंभीर इजा झाली. तर मुलगा मंगेश सुरवाडे याला किरकोळ इजा झाली.
या घटनेनंतर स्थानिकांनी या सर्वांना बाहेर काढत अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचा करुन या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. या घटनेनंतर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी दिलीप सुरवाडे यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community