लसीकरणात भारताने ‘या’ सात बलाढ्य देशांना टाकले मागे…

देशात लसीकरण मोहीम अतिशय वेगाने सुरू आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारत अनेक नवे विक्रम करत आहे. ऑगस्ट महिन्यात भारताने 18 कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस वितरित करण्याचा टप्पा पार केला आहे. मुख्य म्हणजे ही संख्या जी-7 देशांच्या समूहातील सर्व देशांनी मिळून केलेल्या लसीकरणापेक्षाही जास्त आहे. एका ट्वीटद्वारे केंद्र सरकारने ही माहिती जाहीर केली आहे. त्याचबरोबर एका दिवसात 1 कोटी डोस वितरित करण्याचा विक्रमही भारताने केला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करुन भारताने जास्तीत-जास्त लोकसंख्येला प्राधान्याने लसीकरण करण्यावर भर दिला आहे.

 

या देशांना टाकले मागे

जी-7 देशांच्या समूहातील सात देशांनी मिळून ऑगस्ट महिन्यात 11 करोड डोसचे वितरण केले आहे. तर याच्या कित्येक पुढे जात ऑगस्ट महिन्यात 18 करोड लसींच्या डोसचे वितरण केले आहे. जी-7 देशांच्या गटात कॅनडा, युके, अमेरिका, इटली, जर्मनी, फ्रान्स आणि जपान यांसारख्या प्रगत देशांचा समावेश आहे.

ऑगस्ट महिन्यात जी-7 देशांनी केलेले लसींचे वितरण

कॅनडा- 30 लाख
युके- 50 लाख
इटली- 80 लाख
जर्मनी- 90 लाख
फ्रान्स- 1 करोड 30 लाख
अमेरिका- 2 करोड 30 लाख
जपान- 4 करोड

एका दिवसात ‘करोड’ लसी 

यासोबतच भारताने आणखी एक विक्रम नोंदवला आहे. सर्वात जलद 1 कोटी लसींच्या डोसचे वितरण करणारा भारत हा जगातील अग्रेसर देश ठरला आहे. भारताने केवळ एका दिवसात 1 करोड डोसचे वितरण करण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत भारताने अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, युके, जर्मनी यांसारख्या अनेक प्रगत देशांना सुद्धा मागे टाकले आहे.

 

भारतात आतापर्यंत 68 करोड 46 लाख डोसचे वितरण करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात 4 करोड 37 लाखांपेक्षा जास्त लसींचे डोस राज्यांकडे शिल्लक आहेत. भारतीय औषध नियंत्रक मंडळाकडून आतापर्यंत भारतात सहा लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कोवॅक्सिन आणि ZyCov-D या दोन स्वदेशी लसींचा समावेश आहे. या सोबतच कोविशिल्ड, स्पुतनिक-V, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन या विदेशी बनावटीच्या लसींना भारतात मान्यता देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here