देशभरात दर दिवशी महिलांवर अत्याचार होत असून हे प्रमाण वाढू लागले आहे. महिलांवरील हिंसाचार, शारिरीक शोषण आणि लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, महिलांवरील अत्याचाराविषयीची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आकडेवारीनुसार, भारतात 3 पैकी 1 महिला शारिरीक किंवा लैंगिक शोषणाचा बळी ठरत आहे. Stats Of India मध्ये ही धक्कादायक आणि चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.
दरम्यान अनेक प्रकरणांमध्ये पती किंवा कुटुंबातील पुरुष सदस्य महिलेवर हिंसाचार करत असल्याचे या आकडेवारीत सांगण्यात आले आहे. NFHS-5 2019-21च्या सुत्रांनुसार, 62 हजार 381 महिलांवर केलेल्या संशोधनाच्या आधारे स्टॅट्स ऑफ इंडियाने ही आकडेवारी जाहिर केली आहे. Stats of India च्या आकडेवारीनुसार, भारतात तीन पैकी एक महिला तिच्या नव-याकडून शारिरीक किंवा लैंगिक शोषणाचा बळी ठरत आहे. विशेष म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांवरील वैवाहिक हिंसाचाराचे प्रमाण अधिक असल्याचेही समोर आले आहे.
शहरी भागातील 24 टक्के महिलांना पतीच्या हिंसाचाराचा सामना करावा लागतो, तर ग्रामीण भागातील 32 टक्के महिलांना या हिंसाचाराचा सामना करावा लागतो. दरम्यान या आकडेवारीत महिलांसाठी सहा राज्य सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. या सहा राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. या सहा राज्यांमध्ये 18 ते 49 वय असणा-या विवाहित महिलांचा त्यांच्या पतीकडून शारिरीक किंवा लैंगिक छळ झाल्याचे सांगण्यात आले आहे. या सहा राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे.
( हेही वाचा: लातूरमध्ये अपघातात सात वाहने जळून खाक; जीवितहानी झाल्याची भीती )
महिलांवरील अत्याचारासंदर्भात आकडेवारी
- कर्नाटक- 44 टक्के
- बिहार- 40 टक्के
- मणिपूर- 40 टक्के
- तमिळनाडू- 38 टक्के
- तेलंगणा- 37 टक्के
- उत्तर प्रदेश- 35 टक्के
आकडेवारीनुसार, 70 टक्के महिलांना त्यांच्या पतीकडून दारु प्यायल्यानंतर मारहाण करण्यात येते. तर 23 टक्के महिलांना नव-याने दारु न पिताही मारहाण केली आहे. म्हणजेच फक्त व्यसन हेच हिंसाचाराचे कारण नाही. इतकेच नाही तर 77 टक्के महिला अशा आहेत ज्यांच्यावर शारिरीक किंवा लैंगिक हिंसाचार झाला आहे, पण त्यांनी त्याबद्दल कोणलाही सांगितले नाही किंवा कुणाचीही मदत मागितली नाही.
Join Our WhatsApp Community